चहा तीच, कप मात्र वेगळा!
चला, आपण अनुभवुया नवीन विश्वचषक स्पर्धा. फक्त फॉरमॅट वेगळा. या स्पर्धेत लिंबूटीबू संघ औषधालाही आपल्याला सापडणार नाहीत. सर्व आठ संघ अगदी तगडे दोन ग्रुपमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, त्याचं नाव आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. होय मित्रांनो, चहा तीच कप मात्र वेगळा. आठ वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा घाट घातला गेलाय.
बरं, राहून राहून हाच प्रश्न माझ्या मनात येतोय की ही स्पर्धा नक्की आहे तरी कुठे? पाकिस्तानात की दुबईत? सुऊवातीला या स्पर्धेचा फॉरमॅट टी-20 चा असावा असा काहीसा घाट घातला गेला होता. परंतु आयसीसीने विरोध केल्यानंतर सदर स्पर्धेचा फॉरमॅट 50 षटकांचा राहिला. आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचा किती दबदबा असतो हे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटने दाखवून दिले. सुरक्षेच्या कारणावरून भारतीय संघाने पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीला खेळण्यास नकार दिल्यानंतर सदर स्पर्धा ही हायब्रीड मॉडेलवर खेळण्याचं ठरवलं गेलं. त्यामुळे भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार. अगदी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरसुद्धा. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेत खेळायला गेला नव्हता. त्यावेळी त्यांचे गुणही कपात झाले होते. त्यामुळे या स्पर्धेचे यजमान कोण? हा प्रश्न स्वाभाविकच आहे. त्यामुळे बिचाऱ्या बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांना त्रास सहन करावा लागणार हे तेवढेच खरं. त्याला पर्यायही नाही. अर्थात, भारताविना आयसीसी क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करणे ही कल्पनाच कोणाला करता येणार नाही. असो.
मायभूमीत किवीकडून 3-0 असा व्हाईटवॉश. त्यानंतर कांगाऊकडून त्यांच्याच मायभूमीत एक शून्य अशी आघाडी घेतल्यानंतर सुद्धा 3 -1 असा दारुण पराभव. तोही क्रिकेटच्या महत्त्वपूर्ण कसोटी फॉरमॅटमध्ये. त्यानंतर रोहित-विराटवर झालेली टीकेची झोड. या सर्व गोष्टी ढवळून निघाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ कशा प्रकारची कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुसरीकडे या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ थोडासा आपला संघ दुसऱ्या प्रवर्गातील खेळवतो की काय असं वाटू लागलंय. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉर्ज हेझलवूड आणि जायबंदी मीच मार्श या संघात नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा ऑस्ट्रेलियन संघाने स्वाहा केली की काय अशीही शंका येऊ पाहते. अर्थात त्याला आयपीएलही कारणीभूत असू शकेल. दुसरीकडे अफगाणिस्तान संघ मागील काही वर्षात डार्क हॉर्स म्हणून गणला जातोय. परंतु त्यांची गाडी पुढे जात नाही हे तेवढेच खरं. अफगाणिस्तानचे सर्व सामने पाकिस्तानातच असल्यामुळे तेथील खेळपट्टी नेमकी कशी असेल यावरच सर्व काही अवलंबून असेल. कारण पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट फारसे खेळले जात नाही. दुसरीकडे भारतीय संघाचा विचार केला तर 15 च्या चमूमध्ये पाच मंदगती गोलंदाज आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुमराहची अनुपस्थिती विशेष जाणवणार हे तेवढेच खरे. त्यातच मोहम्मद शमी 2023 च्या वर्ल्ड कपसारखा आहे का? हेही आपल्याला तपासून बघावं लागणार. परंतु एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला आणि सद्यस्थितीत भारतीय झटपट क्रिकेटचा विचार केला तर भारतीय संघ निश्चितच उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, अशी अपेक्षा करू शकतो. या स्पर्धेत दोन सामने जिंकणं गरजेचे असल्यामुळे सदर स्पर्धा बाद फेरीची आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हुलकावणी दिलेल्या भारतीय संघाला या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. आज या स्पर्धेचे बिगुल पाकिस्तानात पाकिस्तान विऊद्ध न्यूझीलंड या सामन्याने वाजणार आहे. तर उद्या भारत विऊद्ध बांगलादेश या सामन्याने दुबईत या स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे वरती म्हटल्याप्रमाणे चहा तीच कप मात्र वेगळा, असंच वर्णन चॅम्पियन्स ट्रॉफीचं करावं लागेल एवढं मात्र खरं.!









