भारतीय संघाचीच दादागिरी!!
काल शंभरच्या आत आफ्रिकेला लोळवल्यानंतर भारतीय संघ असेच म्हणत असेल की, है कोई माईका लाल जो हमे चॅलेंज कर सके. या पूर्ण स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपले सर्वोत्तम योगदान दिले. 2003 मधील ऑस्ट्रेलियाच्या संघाने ज्या पद्धतीने त्या विश्वचषक स्पर्धेत कामगिरी केली होती, अगदी तशीच किंबहुना काकणभर जास्त सरस कामगिरी या विश्वचषक स्पर्धेत भारताने केली आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या तीन षटकात तीन गडी बाद झाल्यानंतर ती पंधरा-वीस मिनिटे सोडली तर प्रत्येक वेळी भारतीय संघाने समोरच्याला चितपट केले. इंग्लंडविरुद्ध खराब खेळपट्टीवर सुद्धा 220 धावसंख्या डिफेंड केली. मला तर वाटत नाही की कुठलाच संघ सद्यस्थितीत भारताला आव्हान देईल. ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत जो फलंदाजांवर दबाव टाकलाय, त्याचे पूर्ण मार्क भारतीय गोलंदाजांना द्यावेच लागतील.
आफ्रिकेचे पूर्ण फलंदाज फॉर्मात होते. डी कॉक, मार्करम, क्लासेन, मिलर या सर्व मंडळीनी भारत वगळता इतर देशांविरुद्ध गोलंदाजांची पिसं काढली होती. तब्बल दोनदा 400 चा टप्पा गाठला होता. परंतु भारताविरुद्ध 100 च्या आत घरात, असं चित्र बघायला मिळालं. खऱ्या अर्थाने भारताविरुद्ध त्यांची तलवार मॅन झाली. पूर्ण स्पर्धेत भारताचे तीन मध्यमगती व दोन मंदगती गोलंदाजांचे वजन प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज पेलू शकले नाहीत हे विशेष.
भारताविरुद्ध ज्या ज्या संघाने लढत दिली आहे तो प्रत्येक संघ हाच विचार करत असेल की भारतीय संघात नेमकं काय चाललंय. आठ सामन्यात एक किंवा दोन वेळा भारतीय संघाच्या खेळाडूंना काटे टोचले असतील. या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामना हा जिंकायचाच परंतु त्यासोबत समोरच्याचे खच्चीकरणही करायचे, याच इराद्याने भारतीय संघ खेळला आणि त्यात यशस्वीही झाला. अगदी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, आणि काल-परवाचा आफ्रिकेचा संघही भारताच्या तावडीतून सुटू शकला नाही. एवढ्या सातत्यपूर्ण विजयाची कोणीच कल्पना केली नव्हती. द्रविड गुरुजींच्या शिलेदारांनी आज्ञेचे तंतोतंत पालन केलं. भारतीय संघातील खेळाडूंचे काही अदृश्य हात संघाला मदत तर करत नाही ना असाच संभ्रम समोरच्या संघाला पडला असेल तर नवल नाही.
क्रिकेटमध्ये दादागिरी काय असते ते आपण 1975 व 1979 च्या सुरुवातीला लॉईडच्या नेतृत्वात बघितलं. त्यानंतर काही काळ ऑस्ट्रेलियाच्या स्टीव वॉचा दबदबा होता. परंतु काळ बदलला वेळ बदलली, आणि आता रोहित सेना 2023 च्या विश्वचषकाच्या माध्यमातून क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात ते कमालीचे यशस्वी होत आहेत. कालच्या सामन्यात आफ्रिका थोडीफार कडवी लढत देईल असे मनोमन वाटत होतं. परंतु भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा फलंदाजांचा पालापाचोळा करत प्रतिस्पर्धी आफ्रिकेला धुळीस मिळवलं. कुठलीही विश्वचषक स्पर्धा घ्या, दोन-तीन सामन्यानंतर एक पराभव हा भारताचा निश्चित होता. परंतु या स्पर्धेत ओळीने आठ विजय. त्यापैकी सहा दिग्गज संघासमोर हे विशेष. भारतीय संघ हा या स्पर्धेत पूर्ण त्वेषाने खेळतोय. आणि करलो दुनिया मुठ्ठी मे, हीच त्यांची टॅगलाईन असावी. गंमत बघा, भारतात क्रिकेट म्हटलं की सपाट खेळपट्टी, पाटा विकेट असे हिणवलं जायचं, परंतु त्याच भारतात त्याच खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी निश्चितच सुखावणारी. भले ते व्हाईटबॉल क्रिकेट का असेना. प्रत्येक सामन्यात प्रत्येक गोलंदाजाने पंजा खोललाय. असो. आता शेवटचा सामना जो फक्त औपचारिक आहे त्या सामन्यात प्रमुख फलंदाज व प्रमुख गोलंदाजाला विश्रांती देतो की नाही, हे बघणं औसुक्याचे ठरणार आहे. आता उरली विजेतेपदाची फक्त दोन पावले. ती पावले सावध टाका, एवढीच माफक अपेक्षा.









