प्रतिनिधी / सातारा :
Cousins die of electric shock in Shirgaon, Satara दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शिरगाव (ता. वाई) येथे महावितरणच्या खांबावरची विद्युतवाहक तार खाली आली होती. त्या तारेचा विद्युत पुरवठा सुरु राहिल्याने रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास दोन मुलांना शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलं चुलत भाऊ आहेत, या दुर्दैवी घटनेनेगावावर शोककळा पसरली आहे.
प्रतीक संजय जाधव (वय 16), साहिल लक्ष्मण जाधव (10) अशी या दोन चुलत भावांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गेल्या दोन दिवसापासून परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. वाई तालुक्यातील शिरगावसह काही भागातही हा परतीचा पाऊस झाला होता. त्याच दरम्यान शिरगाव येथील शिरगाव धरणाच्या खाली विठू बाटीक या शिवारातून जाणाऱ्या विद्युत पोलवरील तार तुटली होती. तिचा विद्युत प्रवाह नजिकच्या ओढय़ातील पाण्यात उतरला होता. ही बाब शेतात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निघालेल्या प्रतिक, साहिल यांच्यासह पाच जणांना माहिती नव्हती. प्रतिक आणि साहिल यांना विजेचा शॉक लागला. या दोघांना शॉक लागल्याचे इतर तीन मुलांनी पाहिले. ते त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. सुदैवाने ते तिघे बचावले. दरम्यान, मृत दोन्ही मुलांवर साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु असून याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत झाली नव्हती. प्रतिक हा दहावीला तर साहिल सातवीला होता. प्रतिकला दोन बहिणी आणि साहिलला एक बहिण आहे.
महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दोन मुलांच्या मृत्यूला महावितरण कंपनी जबाबदार आहे. महावितरण कंपनीने जर लक्ष दिले असते. तुटलेल्या तारेतून होणारा विद्युत प्रवाह बंद केला असता तरीही ही घटना घडली नसती. दोन्ही मुलांच्या मृत्यूप्रकरणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.