गुजरातींना ठग म्हटल्याप्रकरणी 22 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अहमदाबादच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तेजस्वी यादव यांना गुजरातींना ठग संबोधल्याच्या मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांच्याविरोधातील मानहानीची तक्रार योग्य मानून तेजस्वी यादव यांना 22 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. अहमदाबादचे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते हरेश मेहता यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. बदनामीचे आरोप सिद्ध करण्यासाठी फिर्यादीच्यावतीने 15 साक्षीदारांच्या जबाबाच्या सीडी आणि साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले. महानगर न्यायालयाचे न्यायाधीश डीजे परमार यांनी मानहानीची तक्रार वैध ठरवत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स बजावले आहे. अशाच प्रकरणात यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.
गेल्या सुनावणीच्या वेळी तक्रारदार हरेश मेहता यांच्या वतीने तेजस्वी यादव यांना समन्स पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा संदर्भ देत खटला सुरू करण्याची मागणी हरेश मेहता यांचे वकील प्रफुल्ल आर पटेल यांनी न्यायालयात केली. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असभ्य भाषेचा वापर हलक्मयात घेऊ नये. आरोपी कोणीही असो, त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशी टिप्पणी केली होती. त्याचाच आधार घेत तेजस्वी यादव हे काही लोकांच्या जोरावर समाजातील किंवा राज्यातील सर्व लोकांना गुंड म्हणू शकत नाहीत, असे पटेल म्हणाले.









