कलम 166 अन्वये मयताच्या कुटुंबाला 1 कोटी 60 लाख देण्याचे आदेश
बेळगाव : ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ट्रकचा विमा नव्हता. त्यामुळे ट्रक मालकाकडून नुकसानभरपाई मिळणे अवघड जाणार होते. दरम्यान दुचाकीस्वाराची चूक नव्हती. दुचाकीवर विमा असलेल्या कंपनीविरोधात दावा दाखल केल्यानंतर त्या विमा कंपनीने 1 कोटी 62 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश येथील मुख्य उच्च दिवाणी न्यायालयाने दिला आहे. संयुक्त निष्काळजीपणा कलम 166 याला कारणीभूत ठरला असा युक्तिवाद केल्यानंतर ही रक्कम मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मयत चंद्रशेखर शिवपुत्रप्पा देशण्णावर (वय 28, रा. तिगडी, ता. बैलहोंगल) हा आणि त्याचा मित्र प्रवीण नागेश शिगेहोळ्ळी (वय 30, रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) हे देवप्रयाग येथे (उत्तराखंड) मोटारसायकलवरून चालले होते. बीटचुंगी-देवप्रयाग या राष्ट्रीय महामार्गावरून जाताना समोरून येणाऱ्या ट्रक क्र. युए 07 के 8691 ने मोटारसायकलला धडक दिली.
मागे बसलेला अभियंता चंद्रशेखर देशण्णावर हा रस्त्यावर पडला. त्याच्या पायावरून ट्रक गेला. तर प्रवीण हा किरकोळ जखमी झाला. चंद्रशेखर याच्यावर श्रीनगर, दिल्ली, डेहराडून येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 25 जानेवारी 2017 रोजी हा अपघात घडला होता. दुचाकीचा विमा होता. मात्र ट्रकचा विमा तसेच ट्रकचालकाचा वाहन चालविण्याचा परवानादेखील नव्हता. त्यामुळे दुचाकीच्या विमा कंपनीवरच नुकसानीसाठी दावा दाखल करण्यात आला. अॅड. एन. आर. लातूर यांनी कलम 166 अन्वये मयत झालेल्या चंद्रशेखर याच्या कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर मयत चंद्रशेखर याच्या कुटुंबाला 1 कोटी 25 लाख सहा टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे. चंद्रशेखर हा अभियंता होता. त्याला वर्षाला 9 लाख 18 हजार 510 रुपयांचे वेतन होते. त्यानुसार न्यायालयाने नुकसानभरपाईचा आदेश दिला. फिर्यादीच्यावतीने अॅड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले.









