स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना रस्ता करणे आले अंगलट
बेळगाव : शहापूर येथील बँक ऑफ इंडियापासून जुना पी. बी. रोडपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करताना दडपशाही करण्यात आली होती. 80 फूट रुंदीचा सीडीपी मॅप होता. एका बाजूची जागा वाचविण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या नागरिकांवर अन्याय करण्यात आला होता. मात्र, याबाबत न्यायालयाने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली हे काम करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने याला स्थगिती दिल्यामुळे अन्याय झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडपर्यंतचे रुंदीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आले. यावेळी अनेकांच्या घरांवर जेसीबी फिरविण्यात आला. काडय्या विभुतीमठ आणि आलाप्पा धानिहाळ यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली. याचबरोबर साईनाथ नागेश अंदागी यांचे घरही पाडण्यात आले होते. या सर्वांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या सर्व कामाला स्थगिती दिली आहे. तसेच ती जागा कब्जात घेण्याचे आदेश देखील दिले आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत कामे करताना सर्वसामान्य जनतेचा विचारच करण्यात आला नाही. दडपशाही करत अनेकांच्या घरांवर, आस्थापनांवर बुलडोझर फिरविण्यात आला. अनधिकृतरीत्या सर्व कामे करण्यात आली. सदर रस्ता हा सिडीपीमध्ये 80 फुटांचा होता. मात्र, तो अधिक रुंदीचा करण्यात आला. याचबरोबर दोन्ही बाजूंच्या जागा समान घेणे गरजेचे होते. मात्र, एका बाजूला अन्याय करायचे आणि दुसऱ्या बाजूची जागा वाचवायची, असा प्रकार करण्यात आल्याचा आरोप काडय्या विभुतीमठ यांनी केला आहे. सदर रस्ता करताना अनेकांच्या इमारती पाडण्यात आल्या. राजकीय दबावातून हा सर्व प्रकार करण्यात आला होता. मात्र पीडितांनी न्यायालयात धाव घेतल्याने उच्च न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली आहे. तसेच रस्त्यासाठी घेतलेली जागा पुन्हा कब्जात घेण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळे पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही पक्षकारांच्यावतीने अॅड. दिनेश एम. कुलकर्णी यांनी काम पाहिले.









