मासिक पाच हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश
बेळगाव : वडिलांना वेगळे ठेवून त्यांच्याकडे लक्ष न देणाऱ्या मुलाला न्यायालयाने मासिक पाच हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. कृष्णा चन्नाप्पा निलजकर (वय 75) रा. मारुती गल्ली, हिंडलगा-सुळगा असे पोटगी मंजूर झालेल्या वृद्धाचे नाव आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे या वृद्धाला मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा यांच्याकडे त्यांचा मुलगा राजू कृष्णा निलजकर (वय 33) याने दुर्लक्ष केले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा इतर मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे कृष्णा हे स्वत: काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, वयोमानामुळे त्यांना यापुढे काम करणे अशक्य झाले आहे. मुलगा दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी जिल्हा कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला. त्याठिकाणी न्यायालयाने फिर्यादीची बाजू ऐकून घेऊन प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी वडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांना न्यायालयाने दणका दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एका वृद्धाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. वृद्धाच्यावतीने अॅड. ए. सी. हनमिनहाळ यांनी काम पाहिले. सध्याच्या धावत्या युगात मुले आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आई-वडिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना अन्नपाणी मिळणेदेखील कठीण झाले आहे. अशा तक्रारी संपूर्ण देशामध्येच वाढल्याने अशा मुलांना दणका देण्यासाठी कायद्याची तरतूद करण्यात आली. सीआरपीसी 125 अंतर्गत मुलांनी आई-वडिलांना पोटगी देणे बंधनकारक आहे. तेव्हा ज्यांची मुले दुर्लक्ष करत आहेत, त्यांनी न्यायालयात धाव घेऊन दिलासा घ्यावा, असे आवाहन अॅड. ए. सी. हनमिनहाळ यांनी केले आहे.









