न्यायालयीन कोठडी 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून धक्का मिळाला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान संजय सिंह यांनी अटकेला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या कोठडीलाही आव्हान दिले आहे. तत्पूर्वी, राऊस एव्हेन्यू न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ईडीने जोरदार युक्तिवाद करत सिंग यांनी दिल्ली मद्य धोरणाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप केला. काही मद्य उत्पादक, घाऊक विव्रेते आणि किरकोळ विव्रेते यांना फायदा करून देण्याचा त्यांचा उद्देश होता, असे सांगत त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली.
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कोठडीत 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीने त्याला न्यायालयात हजर केले. दुसरीकडे त्यांच्या निकटवर्तीयांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. ईडीने विवेक त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली.









