घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून
सोलापूर : घरगुती वादातून झालेल्या भांडणात पत्नी लक्ष्मी मनोज चौगुले (वय ३०) हिच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून खून केल्याप्रकरणी पती मनोज श्रावण चौगुले (वय ३३, रा. विजयनगर, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी अकराच्या सुमारास विजयनगर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली होती.
याबाबत नरसप्पा अर्जुन विटकर (रा. नवीन टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी आरोपी मनोज चौगुले यांच्याविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लक्ष्मी व आरोपी मनोज या दोघांचे लग्न १३ ऑगस्ट २०२१ रोजी झाले होते. आरोपी हा नेहमी लक्ष्मीस त्रासदेऊन भांडण करत असे. १० ऑगस्ट २०२२ रोजी लक्ष्मी हिला आरोपीने नवीन टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) या तिच्या माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर पुन्हा भांडण करणार नाही असे सांगून आरोपी मनोज याने २५ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा सासरी आणले होते.
पती–पत्नी राहत असताना लक्ष्मी हिने घरातील गॅस टाकीसठी म्हणून घरातील कपाटामध्ये एक हजार रुपये ठेवले होते. यातील शंभर रुपये आरोपी मनोज चौगुले याने दारू पिण्यासाठी काढून घेतले. याबाबत लक्ष्मी हिने पतीकडे विचारणा केली असता आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीला लोखंडी पाईपने होक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना ८ सप्टेंबर २०२२ रोजी तिचा मृत्यू झाला.
याबाबत लक्ष्मी हिचा भाऊ नरसप्पा अर्जुन विटकर यांनी फिर्याद दिली होती. या घटनेबाबत अभियोग पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा जबाब व प्रथम नेत्र साक्षीदार सागर जाधव यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुरावा, गुन्ह्यातील हत्यार तसेच आरोपीचे कपडे, त्यावर घटनेवेळी पडलेले डाग, रासायनिक तज्ञांचे विश्लेषण लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावली.








