कोल्हापूर :
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीप्रकरणी पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने, कळंबा कारागृहाची हवा खात आहे. त्याने वैयक्तिक जामिनावर सुटका व्हावी, याकरिता जिल्हा न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा मंगळवारी दुपारी जोरदार युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने कोरटकरचा जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याचा कळंबा कारागृहातील अंडासेलमधील मुक्काम आणखीन वाढला.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करीत, इतिहास संशोधक सावंत यांना दिलेल्या धमकीप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित कोरटकरला अटक केली. अटकेनंतर न्यायालयाने त्याला सुनाविलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कारागृहाच्या अंडासेलमध्ये ठेवले आहे. याचदरम्यान कोरटकरने वैयक्तिक जामिनावर कारागृहातून सुटका करावी, याकरीता गेल्या आठवड्यात जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने मंगळवारी सुनावणीवेळी सरकारी वकील सूर्यकांत पवार, इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद झाला.
सरकारी वकील पवार म्हणाले, कोरटकरला समाजात तेढ निर्माण करायचा आहे. तो स्वत:ला पत्रकार आहे असे सांगतोय. त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक माहितीपट तयार केला आहे, असे देखील तो म्हणतो. मग छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्याचे विचार घृणास्पद कसे काय ? फिर्यादी सावंत हे इतिहास संशोधक आहेत. त्यांना कोरटकरने सुरुवातीला मी कॉल केला नाही असे म्हटले. मात्र हा तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा अपयशी ठरलेला त्याचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात कोरटकरने त्याच्याच मोबाईलवरून सावंत यांना फोन केल्याचे समोर आले. त्यामुळे मोबाईल हॅक झाला हा कोरटकरचा दावा खोटा ठरतो. तसेच त्याचा जामीनअर्ज मंजूर झाला. तर तो पळून जाईल, त्यामुळे तो मंजूर कऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
तर सावंत यांचे वकील सरोदे यांनी कोरटकर खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करीत आहे. तसेच तपासावेळी पोलिसांनी त्याच्या तपास टिप्पणीच्या प्रत्येक पानावर सह्या घेतल्या. त्या पोलीस तपास टिप्पणीवर त्याने वेगवेगळ्या सह्या केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कोरटकरविरोधी कोल्हापूरसह जालना आणि नागपूर येथेही गुन्हे दाखल झाले. त्याच्याविरोधी लावलेली कलमे व होणारी शिक्षा न पाहता. त्याचा जामीनअर्ज फेटाळला जावा, अशी न्यायालयाकडे मागणी केली.
कोरटकरचे वकील घाग यांनी, कोरटकर हा शिवभक्त आहे. गुन्हा घडायच्या आधी शिवजयंती होती. त्यावेळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याची त्याची पोस्ट आहे. या प्रकरणात तपास करण्यासारखा कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच सरकारी वकिलांकडून तो पळून जाईल असे सांगितले जात आहे. आरोपी घरी आल्यावर असे करू शकतो किंवा तसे करू शकतो, असे दावे सरकारी वकिलांकडून केले जात आहेत. मात्र तसे काही होणार नसल्याचे म्हटले.
- कोरटकर व्हीसीद्वारे न्यायालयात हजर
कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचदरम्यान त्याने जामिनावर कारागृहातून सुटका व्हावी. यासाठी अर्ज दाखल केला. यावर मंगळवारी सुनावणीवेळी कोरटकर सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीव्दारे न्यायालयात हजर झाला. तसेच सावंत यांचे वकील असीम सरोदे व कोरटकरचे वकील घाग हे ही सुनावणीला व्हीसीद्वारे उपस्थितीत होते.
- फेटाळलेल्या जामीनअर्जावर अपील करणार
कोरटकरने दाखल केलेला जामीनअर्ज न्यायालयाने सुनावणीअंती फेटाळून लावला. त्याविरोधी तो जिल्हा सत्र न्यायालयात किंवा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन, जामीनअर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.








