नॅशनल हेराल्ड प्रकरणी 8 मे रोजी पुढील सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात आरोपपत्राची दखल घेण्यापूर्वी आरोपींचा सुनावणीचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. यासंबंधीची पुढील सुनावणी गुरुवार, 8 मे रोजी होणार आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदा आणि इतर काँग्रेस नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या मालमत्तेचा यंग इंडियन लिमिटेडच्या माध्यमातून गैरवापर करण्यात आला आणि काँग्रेस नेत्यांना त्याचा फायदा झाला, असा आरोप आहे. आता या प्रकरणाच्या गुणवत्तेवर युक्तिवाद केला जाणार नाही आणि आरोपींना समन्स बजावण्यापूर्वी त्यांना फक्त आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरण हे भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजकीय प्रकरणांपैकी एक आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्यातील व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाने एजेएलला 90.21 कोटी रुपयांचे व्याजमुक्त दिलेले कर्ज नंतर परत केले गेले नाही. 2010 मध्ये हे कर्ज यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडला फक्त 50 लाखांमध्ये हस्तांतरित करण्यात आले, असा आरोप आहे.









