वृत्तसंस्था/ .कोची
केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना नोटीस बजावली. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर प्रियांका यांच्याकडून उत्तर मागितले आहे. भाजप नेत्या नाव्या हरिदास यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी वायनाड मतदारसंघातून प्रियांका यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. प्रियांका यांनी आपल्या उमेदवारी अर्जात स्वत:ची आणि कुटुंबाच्या मालमत्तेची योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप नाव्या हरिदास यांनी केला आहे. निवडणूक निकालावर परिणाम व्हावा म्हणून प्रियांका यांनी जाणूनबुजून मालमत्ता लपवली. ही त्यांची वृत्ती भ्रष्ट प्रथेच्या श्रेणीत येते. प्रियांकाने चुकीची माहिती देऊन आचारसंहितेचेही उल्लंघन केले आहे, असा युक्तिवाद नाव्या हरिदासच्या बाजूने करण्यात आला. संबंधित याचिकेवरील पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे.









