अवमानकारक शब्दप्रयोग टाळणार : 30 पानांची पुस्तिका तयार
मनीषा सुभेदार, बेळगाव
स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या कौतुकाचे गोडवे गायिले जात असले तरी स्त्रियांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन अद्यापही बदललेला नाही. हे वास्तव कोणी मान्य करो वा न करो मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मात्र हे वास्तव गांभीर्याने घेतले आहे. स्त्री सक्षमीकरणाचा खरा अर्थ त्यांनी जाणून घेतला आहे. त्यामुळेच न्यायप्रक्रियेमध्ये म्हणजेच न्यायालयाच्या कामकाजामध्ये महिलांसंदर्भात वापरले जाणारे अनेक अवमानकारक शब्द वापरले जाऊ नयेत, यासाठी त्यांनी फक्त पुढाकारच घेतला नाही तर त्या शब्दांना पर्यायी शब्द देण्यासाठीसुद्धा पुढाकार घेतला आहे. न्यायाधीश चंद्रचूड यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली व कोलकात्याच्या उच्च न्यायालयाच्या न्या. मौसमी भट्टाचार्य, प्रतिमा सिंह व प्रा. झुमा सेन यांनी गेली दोन वर्षे या विषयावर काम केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून 30 पानांची एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये आजपर्यंत न्यायालयाच्या कामकाजात वापरले जाणारे स्त्रियांबद्दल अनादर व्यक्त होईल असे शब्द वापरले जाऊ नयेत यासाठी पर्यायी शब्द देण्यात आले आहेत. वानगीदाखल न्यायाधीशांनी निकाल देताना स्पिन्स्टर, मिस्ट्रेस, प्रॉस्टिट्यूट, अफेअर, चाईल्ड प्रॉस्टिट्यूट असे शब्द कटाक्षाने टाळावयाचे आहेत व त्यासाठी पर्यायी शब्दही देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी महिलांच्या संदर्भात असा विचार करणे आणि त्यांचा अनादर होईल असे शब्द टाळण्यासाठी पर्यायी शब्द देण्यासाठी पुढाकार घेणे, हे त्यांच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे. त्यामुळे समस्त स्त्राrवर्गाने त्यांचे ऋणी राहायला हवे. याच संदर्भात काही वकील आणि प्राध्यापक यांच्याशी संवाद साधता त्यांनी या कृतीचे स्वागत केले आहे.
‘हाऊसवाईफ’ नव्हे ‘होममेकर’
मुली तोकडे पोशाख परिधान करतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात, म्हणून त्यांच्यावर अन्याय होतात. हा आक्षेप या पुस्तिकेने खोडून काढला आहे. या पुस्तिकेमध्ये केवळ पर्यायी शब्द देण्यात आले नाहीत तर स्त्राrचा आत्मसन्मान राखण्याचे प्रयत्न झाले आहेत. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ‘हाऊसवाईफ’ या शब्दाला ‘होममेकर’ हा पर्यायी शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे मी काही नोकरी करत नाही, घर सांभाळते, हे अत्यंत संकोचाने सांगणाऱ्या महिला आता आपण ‘होममेकर’ आहोत, असे अभिमानाने सांगू शकतील.
पुस्तिकेमध्ये संवेदनशीलतेचे विचार
बलात्कारी व्यक्तीने बलात्कार पीडितेशी विवाह करावा, अशी मागणी बऱ्याचदा केली जाते. पण सदर पुस्तिकेने या मागणीलाही आक्षेप घेतला आहे. शिवाय स्त्रियांबरोबरच लहान मुले, समलिंगी, तृतीयपंथी या सर्वांचाच या पुस्तिकेमध्ये संवेदनशीलतेने विचार करण्यात आला आहे. एखादी पुस्तिकामुळे रातोरात बदल होणे हे जरी शक्य नसले तरी त्याचे गांभीर्य समाजाने आणि न्यायालयाने लक्षात घेतल्यास हा बदल निश्चितच होईल, यात संदेह नाही.
सरन्यायाधीशांनी उचललेले पाऊल स्वागतार्ह
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी उचललेले पाऊल अत्यंत स्वागतार्ह असे आहे. मुख्य म्हणजे सर्वोच्चपदी असलेल्या सरन्यायाधीशांच्या मनात असा विचार येणे, स्त्रियांबद्दलचे अवमानकारक शब्द त्यांना खटकणे आणि त्यासाठी त्यांनी कृतिशील होणे हे खूप महत्त्वाचे आहे. पाणी जसे वरून खाली झिरपत येते, त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायाधीशच एखादा बदल सूचवतात, तेव्हा तो स्थानिक पातळीपर्यंत स्वीकारलाही जातो. या पुस्तिकेमधून जे पर्यायी शब्द सूचविण्यात आले आहेत, त्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याची कलुषित मनोवृत्ती दूर होण्यासाठी मदत होणार आहे. न्यायाधीश या शब्दातच न्याय देणारे हा गर्भितार्थ आहे. त्यामुळे ते जेव्हा असा कृतिशील निर्णय घेतात आणि त्यांना तीन महिला न्यायाधीश सहकार्य करतात, हे खूप आशादायी चित्र आहे.
वकील व निवृत्त न्यायाधीश अजित सोलापूरकर
महिलांचा आत्मसन्मान बळकट : अॅड. अश्विनी बिडीकर
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना असा बदल करावासा वाटणे ही संवेदनशीलता त्यांचे व्यक्तिमत्त्वच अधोरेखित करते. असे शब्द केवळ न्यायालयाच्या कामकाजातच नव्हे तर समाजातही वापरले जातात आणि आपण इतके रुढार्थाने मुरलो आहोत किंवा निबर झालो आहोत की आपल्याला अशा शब्दांचे काहीही वावगे वाटत नाही, हे दुर्दैव आहे. सरन्यायाधीशांच्या मनात असा विचार येणे, याचे मनापासून कौतुक वाटते. बदल तडकाफडकी होणार नाहीत. परंतु, त्यांनी असे पाऊल उचलल्याने आपल्याला निश्चितच सकारात्मक बदल दिसतील आणि न्यायालयीन कामकाजात कोणीही असा शब्द वापरला तर स्वत:वरच शिंतोडे उडवून घेण्यासारखे होईल, याचे भान आता सर्वांनीच बाळगायला हवे. महिलांचा आत्मसन्मान बळकट करण्याच्यादृष्टीने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याबद्दल समस्त स्त्रियांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
स्त्रियांचा सन्मानासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत
स्त्रियांचा उल्लेख संवेदनशीलतेने केला जावा, यासाठी पुढाकार घेणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मताशी मी सहमत तर आहेच. भारतीय स्त्राrच्या सन्मानाच्यादृष्टीने ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. स्त्रियांविषयी पिढ्यान् पिढ्या रुढ झालेले व स्त्रियांचा अवमान करणारे काही शब्द टाळणे व त्याविषयी पर्यायी शब्द उच्चारून स्त्रियांचा सन्मान कायम राहील यासाठी केवळ सरन्यायाधीशच नव्हे तर आपण सर्वांनीच प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे. मी स्वत: न्यायालयामध्ये या शब्दांचाच वापर व्हावा, याचा आग्रह धरेन.
अॅड. सुधीर चव्हाण (बार असोसिएशन प्रभारी अध्यक्ष)
महिलांचा सन्मान आणि समानता हवी : प्रा. अमित चाटे
स्त्रियांप्रती आदर आणि समानता ही दोन मूल्ये समाजाच्या सामाजिक, न्यायिक व मानवाधिकारासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. महिलांचा आदर करणे म्हणजेच त्यांचा सन्मान राखणे, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे आणि समाजामधील त्यांच्या योगदानाचे महत्त्व मान्य करणे होय. महिलांची दखल घेणे आणि त्यांच्या बाबतीत कोणताही पूर्वग्रह न बाळगणे हे कामाच्या ठिकाणी, शैक्षणिक संस्थांमध्ये, सर्व सरकारी व सार्वजनिक कार्यालये व संस्थांमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. स्त्रिच्या नकाराचा आणि निवडीचा अधिकार आपण मान्य करायला हवा. ‘माझे शरीर माझा हक्क’ हे स्त्रियांचे म्हणणे समाजाने आता स्वीकारायलाच हवे. त्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महिलांचा सन्मान आणि समानता या दोन्ही दृष्टीने जे पाऊल उचलले आहे, यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे.
स्त्री-पुरुष समानता आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न
खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्त्री -पुरुष समानता आणण्याच्यादृष्टीने केलेले प्रयत्न हे महिलांसाठी अत्यंत पूरक ठरणारे आहेत. किमान यापुढे तरी महिलांना गृहीत धरले जाणार नाही, अशी आपण आशा करू. न्यायाधीश, वकील आणि फिर्यादी या सर्वांनीच आता सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या पर्यायी शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्या देशात सतत समानतेची घोषणा केली जाते. मात्र, ही समानता जेव्हा स्त्राr-पुरुष या दोघांनाही सन्मानाने वागविले जाईल, तेव्हाच प्रत्यक्षात येणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फार महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी करून आपण त्यांचा आदर करायला हवा. किमान कायदेशीर भाषेमध्ये पारदर्शकता व संवेदनशीलता आपल्याला अनुभवता येईल, अशी आशा करूया.
अॅड. नयना नेर्ली (जिल्हा, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील)









