वृत्तसंस्था / कोलकाता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला कलकत्ता उच्च न्यायालयाने काही अटींवर अनुमती दिली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने या सभेला अनुमती नाकारली होती. तथापि, या निर्णयाविरोधात काही याचिकाकर्त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या याचिकेला सशर्त संमती दिल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का असल्याचे मानले जात होते. त्यांचा सभेला विरोध होता.
ही सभा येत्या रविवारी, अर्थात 16 फेब्रुवारीला होत आहे. सध्या राज्यात माध्यमिक परीक्षा होत असून या सभेतील ध्वनिवर्धकांमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. तथापि, सभा ज्या स्थानी होत आहे, त्या परिसरात कोणतीही शाळा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा प्रतियुक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला होता. या सभेला येणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे आणि ध्रानिवर्धकांची तीव्रता अधिक असू नये, अशा दोन अटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता सिन्हा स्पष्ट केल्या आहेत. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे. कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पिडीतेच्या मातापित्यांनी भागवत यांची भेट घेतली. भागवतांनी या दुर्दैवी घटनेसंबंधी दु:ख व्यक्त केले आणि मातापित्यांचे सांत्वन केले.









