वृत्तसंस्था/ गया
गयामधील शेरघाटी न्यायालयात बुधवारी गोळीबाराची घटना घडली. लोक जनशक्ती पक्षाचे (पारस गट) नेते अन्वर अली खान यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हेगारांनी गोळ्या घातल्या. यात तो गंभीर जखमी झाला आहे. यादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एका पोलिसालाही बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घातल्या. यात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य एकाला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार सुरू असतानाच हल्लेखोर पायीच न्यायालयाच्या आवारातून पळून गेले. गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. तसेच याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. न्यायालय आवारात लोकांची गर्दी झाली होती.









