सर्व संबंधीत खात्यांना बजावल्या नोटिसा ; तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश
पणजी ; पर्वरीपासून पणजीसह मेरशीपर्यंत होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक प्रवासी ‘जाम’ झाल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून स्वेच्छा जनहित याचिका (सुमोटो) नोंद करुन घेतली आहे. तसेच पणजी महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, स्मार्ट सिटी, पर्यटन खाते, वाहतूक खाते अशा सर्व संबंधित खाती, यंत्रणांना न्यायालयाने नोटिसा बजावल्या असून वाहतूक कोंडीवर त्वरित तोडगा काढण्याची सूचना केली आहे. पणजी शहरात तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून त्याबाबत वारंवार आवाज उठवूनही सरकार दखल घेत नाही. कोणतीही उपाययोजना करीत नाही असे दिसून आल्याने शेवटी न्यायालयाने दखल घेण्याचे काम केले आहे.
पणजीत वारंवार होतेय वाहतूक कोंडी
अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिलेल्या माहितीनुसार सांता मोनिका जेटीसमोर, पॅसिनोसमोर नेहमीच वाहतुकीचा खोंळबा होतो म्हणून एक जनहित याचिका न्यायालयासमोर आली होती. त्यातच अटल सेतू वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीची व्याप्ती पणजीसह पर्वरी ते मेरशीपर्यंत वाढल्याचे मागील दोन-तीन आठवड्यात वारंवार समोर आले होते. राजधानी पणजीत ही समस्या वारंवार भेडसावत असल्याने न्यायालयाने संपूर्ण पणजीचा प्रश्न म्हणून ती याचिका नोंद करुन घेतली आहे.
जबाबदारी झटकण्याकडेही वेधले लक्ष
पणजीत विविध ठिकाणी आणि प्रामुख्याने रस्त्यावर स्मार्ट सिटीची कामे सुऊ असल्याने संपूर्ण पणजी शहरच वाहतूक कोंडीत सापडले आहे. त्याबाबत नागरकांनी, वाहनचालकांनी प्रवाशांनी विचारणा केल्यावर सरकारी यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकताना दिसून येत आहे. त्याकडेही या याचिकेतून लक्ष वेधण्यात आले आहे. वाहनचालक तसेच जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन आता न्यायालयालाच या प्रकरणी पुढाकार घेऊन याचिका नोंद करण्याची पाळी आली आहे.
त्वरित तोडगा काढण्याची सूचना
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काहीतरी उपाय शोधण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडीमुळे लोकांची गैरसोय होत असून त्याकडे लक्ष देण्याची सूचना न्यायालयाने सर्व संबंधित यंत्रणा, खाती यांना केली आहे आणि उत्तर देण्यास बजावले आहे.









