पती-पत्नीने घेतला घटस्फोट, तरीही एकाच छताखाली वास्तव्य
पती-पत्नी परस्परांना वैतागून गेल्यावर नाते तुटू लागते. याचा परिणाम अखेरीस घटस्फोट घेत वेगळे होणे असतो. परंतु अमेरिकेतील एक दांपत्य घटस्फोट घेतल्यावरही एकाच छताखाली राहत आहे. असे करण्यामागे मुलांवरील प्रेम कारणीभूत नसून आर्थिक हतबलता आहे. एका कर्जामुळे त्यांची जोडी कायम राहिली आहे.
घटस्फोटानंतर पती-पत्नी वेगळे राहत असतात. परंतु अमेरिकेत घटस्फोटित दांपत्य आर्थिक हतबलतेमुळे एकच राहत असल्याची अनेक प्रकरणे आहेत. याचे कारण घराच्या कर्जाचे वाढते व्याजदर आहेत. फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलमध्ये राहणारे रायन हॅम्ब्री आणि मॉर्गन डिक्सन याच स्थितीला तोंड देत आहेत. दोघांनी एप्रिलमध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला, परंतु अद्यात ते एकाच घरात राहत आहेत. याचे कारण त्यांनी पूर्वी घराला 2 टक्के व्याजदरावर रिफायनान्स करविले होते. घर विकून वेगवेगळे नवे घर खरेदी केल्यास त्यांना अधिक व्याजदर भरावा लागणार आहे.
यामुळे रायन घरात राहतात, तर मॉर्गनने घराच्या अंगणात उभ्या एअरस्ट्रीम ट्रेलरमध्ये वास्तव्य सुरू केले आहे. दोघेही परस्परांपासून काही फुटांच्या अंतरावर राहतात. पैशांचा हिशेब नीट सुरू आहे, परंतु सीमा निश्चित करणे अवघड आहे. अनेकदा आम्ही विवाहित असल्याचे वाटते, कारण मॉर्गन नेहमी आसपास असते, परंतु आता या नात्यात जवळीकता नाही असे रायन यांनी म्हटले आहे. मुले देखील या अनोख्या व्यवस्थेचा हिस्सा ठरले आहेत. ते कधी घरात राहतात, तर कधी ट्रेलरमध्ये कॅम्प आउटची मजा घेतात.









