स्कॉर्पिओची निवारा शेडला धडक : पाच जखमी
वार्ताहर /तवंदी
तवंदी घाटात स्कॉर्पिओ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने निवारा शेडला जोराची धडक दिली. या अपघातात वृद्ध पती-पत्नी जागीच ठार झाले तर स्कॉर्पिओ गाडीतील अन्य चौघेजण तसेच निवारा शेडमध्ये थांबलेला महाविद्यालयीन विद्यार्थी असे पाच जण जखमी झाले. शिवदास बोरकर (वय 65) व सुरेखा शिवदास बोरकर (वय 60, रा. केसरवाडा, जिल्हा भंडारा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुहास रामदास ढोके (वय 38), नितेश ढोके (वय 35), प्रियांका ढोके (वय 31), स्पृशा (वय 4, सर्व रा. केसरवाडा) व प्रल्हाद किल्लेदार (वय 18, रा. चिंचणी) हे पाचजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हॉटेल अमर समोर घडला.
स्कॉर्पिओ कार क्रमांक एम. एच. 17 एजे 5555 ही गोवा येथून भंडाराकडे चालली होती. दरम्यान हा अपघात होण्यापूर्वी अज्ञात वाहनाचे ऑईल महामार्गावर शंभर ते दीडशे फूट पडले होते. त्यामुळे स्कॉर्पिओ चालक नितेश ढोके याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने महामार्गाशेजारी असणाऱ्या निवारा शेडला जोराची धडक दिली. यात शिवदास बोरकर व सुरेखा बोरकर हे पती-पत्नी ठार झाले. तर वाहनातील अन्य चौघे तसेच निवारा शेडमध्ये स्तवनिधी येथील कॉलेजमध्ये शिकत असलेला युवक प्रल्हाद किल्लेदार हा देखील जखमी झाला.
सुदैवाने निवारा शेडमध्ये थांबलेले अन्य पाच ते सहा विद्यार्थी बचावले. हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर वाहन विऊद्ध दिशेला जाऊन उभे राहिले. वाहनाचा चक्काचूर झाला. सर्व जखमींवर महात्मा गांधी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत
घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर, सहाय्यक फौजदार सूर्यवंशी, हवालदार गस्ती, मंजुनाथ कल्याणी तसेच अवताडे कंपनीचे सुपरवायझर विष्णू व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.









