राजस्थानी कुटुंबाचा बालक अपहरण प्रकरणात पोलिसांचा जलद कारवाई
सांगली : येथील विश्रामबाग चौकातून राजस्थानी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. ७२ तासात त्या मुलास सुखरूप मातेच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले होते. याप्रकरणात इम्तियाज पठाण, बसीमा इम्तियाज पठाण (रा. मिरज) हे दाम्पत्य पसार होता. आज त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने शिराळ्यात छापेमारी करून अटक केली.
दरम्यान, न्यायालयासमोर हजर केले असता सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली. इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज याला यापुर्वी अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी, की राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी (रा. कनवास, जि. कोटा) हे रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. विश्रामबागला रस्त्याकडेलाच ते पत्नी, एक वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह राहत होते. सोमवारी (ता. २०) मध्यरात्रीनंतर १ वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीने या मुलास पळवून नेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे बाळ गायब झाल्याचे पाहून सर्वत्र शोधाशोध केली. परंतु बाळ न सापडल्याने पती-पत्नीने टाहो फोडला. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला सूचना दिला. त्यांनी विश्रामबाग पोलिसांना बरोबर घेऊन तपास सुरू केला. तब्बल ७२ तासांनंतर बाळाचा शोध सावर्डे (जि. रत्नागिरी) येथे लागला. त्यानंतर बाळाला आणून आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी इनायत गोलंदाज याला अटक केली आहे. त्याचे साथीदार इम्तियाज व वसीमा पठाण हे पसार होते. त्यांच्या शोधासाठी विश्रामबागचे निरीक्षक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते. आज शिराळा येथे छापेमारी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रवीण कांचन, अंमलदार स्नेहल मोरे, बिरोबा नरळे, पुजा कोकाटे जगदाळे यांचा कारवाईत सहभाग होता








