भयगंडातून वृद्ध दाम्पत्याने संपविले जीवन : सायबर गुन्हेगारांकडून लूट
खानापूर : सध्या देशात डिजिटल अरेस्ट स्कॅमने थैमान घातले आहे. डिजिटल गुन्हेगारांच्या जाळ्यात बिडी येथील वृद्ध दाम्पत्य बळी पडले आहे. बिडी येथील दियागो संतान नाजरेत (वय 83) व त्यांची पत्नी फ्लावियाना दियागो नाजरेत (वय 79) यांनी डिजिटल अरेस्टच्या भयगंडातून स्वत:च्या बिडी येथील राहत्या घरी गुरुवार दि. 27 रोजी रात्री उशिरा आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी 10 नंतर उघडकीस आला. खानापूर तालुक्यात डिजिटल अरेस्ट होण्याची आणि सायबर गुन्हेगारांकडून लुटण्याची ही पहिलीच घटना असून वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे बिडी परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
दियागो नाजरेत आणि त्यांची पत्नी फ्लावियाना नाजरेत हे बिडी येथील आपल्या घरी राहत होते. दियागो नाजरेत हे मुंबई येथे मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी बिडी येथील आपल्या मूळगावी वास्तव्य केले होते. नाजरेत हे बिडी परिसरातील विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा अभ्यास घेत होते. सर्वांशी मिळून मिसळून राहत होते. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली येथील एका सायबर गुन्हेगाराने या दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट करून तुमच्या फोनमधून मोठा गुन्हा घडला असून तुम्हाला कायमस्वरुपी जेलमध्ये टाकण्यात येणार आहे.
पैसे दिल्यास तुम्हाला गुन्ह्यातून मुक्त करण्यात येईल, असे सांगून गेल्या तीन महिन्यांपासून या दाम्पत्याकडून जवळपास 5 लाखांची रक्कम उकळण्यात आली होती. गुन्हा पूर्णपणे निकालात काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपये देणे जरुरीचे असल्याचे सांगून त्यांना धमकी दिली होती. या धमकीमुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून नाजरेत दाम्पत्य दहशतीखाली वावरत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे रकमेची मागणीही केली होती. मात्र सरळ आणि साधे जीवन जगणारे नाजरेत हे एवढ्या तातडीने रक्कम का मागत आहेत, याची विचारपूस केल्यावर या दाम्पत्याने कोणतीही खरी माहिती दिली नाही.
अखेर या दहशतीखालीच दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले. नाजरेत यांनी आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या देऊन आत्महत्येस भाग पाडले. तर स्वत: धारधार चाकूने आपल्या मानेवर जखम करून घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेदना सहन होत नसल्याने त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत घरासमोरील पाण्याच्या हौदात स्वत:ला बुडवून घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी पुतण्याची पत्नी काही कामानिमित्त घरात गेली असता त्यांना हा प्रकार दृष्टीस पडला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली.
यानंतर नंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एम. पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नाजरेत यांनी धारधार चाकूने आपल्या मानेवर आणि हातावर घाव करून घेतल्याने बेडरूममध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पसरला होता. आपले प्राण जात नसल्याने त्यांनी त्याच अवस्थेत चालत जावून हौदात उडी मारली. रक्ताच्या थारोळ्यातून चालत गेल्याने रक्ताच्या पाऊलखुणा दिसून आल्या. तर नाजरेत यांच्या पत्नीचा मृतदेह खाटावर आढळून आला. याबाबत त्यांचे पुतणे कैतान नाजरेत यांनी नंदगड पोलिसात तक्रार दिली आहे. नाजरेत यांनी आपल्या टेबलवर इंग्रजीमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली असून यात डिजिटल अरेस्टची सविस्तर माहिती लिहिलेली आहे.
ही सुसाईड नोट, तसेच चाकूसह इतर वस्तू पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास चालविला आहे. या घटनेची माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीसप्रमुख श्रुती, तसेच बैलहोंगल विभागीय उपपोलीसप्रमुख रवि नायक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एस. पाटील यांना तपासाच्यादृष्टीने सूचना केल्या आहेत. नंदगड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या निर्देशानुसार सायबर विभागाकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे. बिडी येथील नाजरेत कुटुंबीयांच्या हृदयद्रावक आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. अशाप्रकारे डिजिटल अरेस्ट होण्याची पहिलीच घटना आहे. मनमिळावू नाजरेत दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे बिडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बिडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बिडी, नंदगड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाजरेत कुटुंबीयांच्या पश्चात पुतणे आहेत.









