गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावातील घटना : दोघेही मन्नोळीचे : घटनेने हळहळ
बेळगाव : प्रियकराव्यतिरिक्त दुसऱ्या तरुणासोबत घरच्यांनी साखरपुडा करून दिल्याने आपली ताटातूट होईल या भीतीने प्रेमीयुगुलाने एकाचवेळी ऑटोरिक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 10 च्या सुमारास गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावानजीकच्या घटप्रभा नदीकाठावर ही घटना घडली आहे. रंजिता अडीवेप्पा चोबारी (वय 22) आणि राघवेंद्र नारायण जाधव (वय 28) (दोघेही रा. नागलिंगेश्वर नगर, मन्नोळी, ता. सौंदत्ती) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, रंजिता आणि राघवेंद्र हे दोघेजण एकाच गल्लीतील राहणारे असून ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र रंजिताच्या कुटुंबीयांनी 10 दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा हुबळी येथील एका तरुणासोबत केला होता. त्यामुळे एकमेकापासून आपली ताटातूट होणार या नैराश्येतून दोघेजण सोमवारी दुपारी 1 च्या दरम्यान ऑटोरिक्षातून बाहेर गेले.
राघवेंद्र हा ऑटोरिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. दोघेजण रिक्षातून बाहेर पडल्यानंतर ते गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावानजीकच्या घटप्रभा नदीच्या काठावर गेले. त्या ठिकाणी रिक्षाच्या पाठीमागील सिटवरच्या टॉपवरील लोखंडी अँगलला नायलॉन दोरी बांधून दोघांनीही एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी 10 च्या दरम्यान उघडकीस आल्यानंतर काहींनी ही माहिती गोकाक पोलिसांना दिली. त्यानंतर गोकाक ग्रामीणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. नातेवाईक सायंकाळी गोकाकला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करण्यासह कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. याप्रकरणी रंजिताची आई विजयालक्ष्मी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गोकाक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.









