मुडलगी पोलिसांची कारवाई : 6 तोळ्यांचे दागिने जप्त
बेळगाव : बसमध्ये चढताना महिलांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या हुबळी येथील एका जोडगोळीला मुडलगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राजेश सोमनाथ रामगिरी (वय 38), दिनेश लक्ष्मण गायकवाड (वय 35) दोघेही राहणार हुबळी अशी त्यांची नावे आहेत. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकुड, उपनिरीक्षक राजू पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
19 ऑगस्ट 2025 रोजी धर्मंटी ता. मुडलगी येथील सोनव्वा भरमाप्पा पुजारी यांनी मुडलगी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुडलगी बसस्थानकावर बसमध्ये चढताना एक तोळ्याचे बोरमाळ, एक तोळ्याचे एक्सार पळविण्यात आले होते. याचवेळी सोनव्वा यांच्या सोबत असलेल्या लक्ष्मीबाई हेगण्णावर या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे बोरमाळ पळविण्यात आले होते. याप्रकरणी हुबळी येथील जोडगोळीला अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता मुडलगीबरोबरच कटकोळ येथेही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुखांनी मुडलगी पोलिसांचे या कारवाईबद्दल कौतुक केले आहे.









