बेळगाव :
अमलीपदार्थाची विक्री करणारे व सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरूच आहे. मार्केट पोलिसांनी संभाजी गल्ली, महाद्वार रोड परिसरात हेरॉईन विकणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. गांजापाठोपाठ हेरॉईन व चरसही बेळगावात मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचे यावरून उघडकीस आले आहे. वैभव प्रकाश कुरणे (वय 21) राहणार महाद्वार रोड, ओंकार चंद्रशेखर जोशी (वय 19) राहणार पाईपलाईन रोड अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार कुरळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली आहे.
या दोघा जणांच्या ताब्यातून सुमारे 18 हजार रुपये किमतीचे 24 ग्रॅम 87 मिली हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्यांनी हेरॉईन कुठून आणले, याची चौकशी करण्यात येत आहे. या दोघा जणांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 21(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









