निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसिडर आहेत नेगी
वृत्तसंस्था / किन्नौर
हिमाचल प्रदेश विधनासभा निवडणुकीसाठी देशातील प्रथम मतदार 106 वर्षीय श्याम सरन नेगी यांनी स्वतःचा मताधिकार बजावला आहे. घरातून मतपत्रिकेद्वारे मतदान केले असून यावेळी किन्नौरमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित राहिले. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पात्र लोकांना, दिव्यांगांनाही ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. श्याम सरन नेगी यांना निवडणूक आयोगाने चालू वर्षी ब्रँड ऍम्बेसिडर देखील केले आहे.
देशात 1952 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक पार पडली होती. परंतु किन्नौरमध्ये प्रचंड हिमवृष्टीमुळे 5 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 1951 मध्ये मतदान झाले होते. श्याम सरन नेगी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. निवडणुकीदरम्यान ते किन्नौर जिल्हय़ातील एका शाळेत तैनात होते. तसेच निवडणूक कार्यात सामील होते. त्यावेळी ते मतदान करणारे देशाचे पहिले मतदार ठरले होते.
सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करण्याचा अर्थ योग्य व्यक्तीला सत्तेवर आणणे असल्याचे म्हणत श्याम सरन नेगी यांनी घरीच मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
स्वतंत्र भारतातील पहिले मतदार किन्नौर जिल्हय़ातील असल्याचा पूर्ण हिमाचल प्रदेशला अभिमान वाटतो. श्याम सरन नेगी नेहमीप्रमाणे मतदान केंद्रावर जात मतदान करू इच्छित होते, परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांचे घरीच मतदान करविण्यात आले आहे. त्यांनी 12डी अर्ज भरल्यावर प्रशासनाने घरात मतदान करविण्याची व्यवस्था केल्याचे जिल्हा उपायुक्तांनी सांगितले आहे.









