सातारा :
सातारा शहरातील कुख्यात गुंडाकडून गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. निकेत वसंत पाटणकर (वय 32, रा. चंदननगर, कोडोली, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षाकरीता तडीपार केलेले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील एमआयडीसीतील हॉटेल व्यावसायिकांकडून गुंड निकेत पाटणकर खंडणी मागत होता. ती न दिल्यास तेथे जाऊन हॉटेलची तोडफोड करत होता. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा घडल्यापासून तो सुमारे तीन महिने फरार होता. त्याचा विविध ठिकाणी पोलीस कसोशीने शोध घेत असताना तो सोमवारी सातारा शहर परिसरातील जानाई मळाईच्या पायथ्याला त्याच्या खास साथीदारास भेटण्यासाठी येणार असल्याची व तो स्वत:जवळ गावठी पिस्टल बाळगून असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झालेली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचे डी. बी. पथक जानाईमळा, चंदननगर परिसरामध्ये दोन टीम तयार करून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. रात्रीचे वेळी तो जानाईमळा रोडवरून जात असताना त्यास पोलिसांची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्यास चारही बाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे कमरेस एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्याच्याकडे या पिस्तुलचा कोणताही परवाना नसताना ते अवैधरित्याजवळ बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याने व तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, कॉन्स्टेबल सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी केलेली आहे.








