वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनच्या विस्तारवादी आणि शोषण करणाऱ्या आर्थिक धोरणांना आता आफ्रिकेतील देशांनींही विरोध केला आहे. काही वर्षांपूर्वी चीनने मोठ्या प्रमाणावर पैशाचे पेरणी करुन या देशांना आपले बांधील बनविले होते. त्या जोरावर या देशांमधील मौल्यवान खनिज संपत्तीच्या उत्खननाचे परवानेही मिळविले होते. तथापि, चीनकडून आपली फसगत होत आहे, हे लक्षात आल्याने आता हे देश चीनला विरोध करत असून अन्य लोकशाही देशांकडे त्यांचा कल वाढत आहे.
या देशांमध्ये मोठी गुंतवणूक करुन तसेच अन्य मार्गांनी या देशातील राजकारण्यांना वश करुन घेऊन चीनने या देशांमध्ये बेकायदा खाणकाम मोठ्या प्रमाणात चालविल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या देशांमधील जनतेचा चीनच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आपल्या देशातील खनिज संपत्तीचा लाभ अधिक प्रमाणात चीनलाच मिळताना पाहून या देशांमधील नागरीक संतप्त झाले आहेत. त्यामुळे या देशांमधील सत्ताधारी आणि राजकारणी यांच्यावर दबाव वाढत असल्याने त्यांनी चीनशी फारकत घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसत आहे.
नायजेरियाकडून परवाने रद्द
आफ्रिका खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या नायजेरिया या देशाने चीनच्या बेकायदा खाणकाम करणाऱ्या काही कंपन्यांची मान्यता काढून घेतली आहे. या देशात लिथीयम या महत्वाच्या मूलद्रव्याचे उत्खनन करण्याचे अनुमतीपत्र चीनने मिळविले होते. हे अनुमतीपत्र चीनने भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळविल्याचा आरोप झाल्यानंतर आता ते रद्द करण्यात आले आहे. अशाच प्रकारे आफ्रिकन महासंघातील अनेक देशांनीही चीनला नाकारण्यास प्रारंभ केला असून आता त्यांनी अमेरिका आणि इतर युरोपियन देशांकडून साहाय्य मागितले आहे.









