शिवाजी विद्यापीठ निवडणुकीत दुपारपर्यंतचे चित्र; निवडणूक लागलेल्या 8 अभ्यास मंडळावर विकास आघाडीपेक्षा सुटाला जास्त जागा; विद्यापीठ शिक्षक मतदार संघात सुप्टाच्या तिन्ही उमेदवारांचा विजय
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळाच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून प्रारंभ झाला. सर्वप्रथम जाहीर झालेल्या निकालात विद्यापीठ शिक्षक मतदार संघात सुप्टाच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली. निवडणूक लागल्यानंतर 10 अभ्यास मंडळ बिनविरोध झाली. तर 8 अभ्यास मंडळासाठी निवडणूक लागली होती. यामध्ये विद्यापीठ विकास आघाडीपेक्षा सुटाच्या जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी यंदाही आघाडीनेच अभ्यास मंडळावर आपलाच झेंडा फडकवला. दुपारपर्यंत विद्यापीठ शिक्षक व अभ्यास मंडळाची मतमोजणी पूर्ण झाली. निवडून आलेल्या उमेदवारांनी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाला अभिवादन करीत आनंद व्यक्त केला.
विद्यापीठ परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली आणि सातारा तिन्ही जिल्हय़ांतील 33 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 50 जागांपैकी 100 जागांचे निकाल जाहीर झाले. निवडणूक लागलेल्या अभ्यास मंडळावर आघाडीचे जास्त उमेदवार येतील असा अंदाज होता परंतू सुटाचे जास्त उमेदवार निवडून आले. आघाडीच्या उमेदवारांना सुटाच्या उमेदवारांनी चांगलीच लढत दिल्याने सुटाच्या उमेदवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे मात्र निवडणूक लागताच प्राचार्य आणि संस्थाचालक मतदार संघ बिनविरोध झाले असून, सर्व उमेदवार विकास आघाडीचेच आहेत.
अभ्यास मंडळावर निवडून आलेल्या उमेदवारांची नावे
बिझनेस इकॉनॉमी ः डॉ. हिंदुराव संकपाळ, डॉ. संजय धोंडे, डॉ.गजानन पट्टेबहाद्दूर. हिंदी ः डॉ. भास्कर भवर, डॉ. संग्राम शिंदे, डॉ. अशोक बाचूळकर. प्राणीशास्त्र ः सत्यवान पाटील, एल. पी. लंका, तानाजी चौगुले. मानसशास्त्र ः डॉ. विकास मिणचेकर, डॉ. विनायक होनमोरे, डॉ. विजयमाला चौगुले. कॉमर्स ः डॉ. आर. के. दिवाकर, डॉ. यु. आर. शिंदे. डॉ. इंग्रजी ः डॉ. यु. आर. पाटील, डॉ. डी. डी. वाघमारे, डॉ. ए. एस. आरबोले. अर्थशास्त्र ः डॉ. प्रभाकर माने, डॉ. अनिल सत्रे, डॉ. जयवंत इंगळे. भुगोल. डॉ. एस. बी. जाधव, डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. राजेखान शिकलगार. रसायनशास्त्र डॉ. डी. के. दळवी, डॉ. आर. के. माने, डॉ. रमेश एलगुद्रे
विद्यापीठ शिक्षक विजयी उमेदवार
विद्यापीठ शिक्षक मतदार संघात सुप्टाचे डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. शंकर हंगीरगेकर, डॉ. माधुरी वाळवेकर उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली असून आम्ही कोणत्याही आघाडीचे नाही, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेचे (सुप्टा) अध्यक्ष डॉ. नंदकुमार मोरे यांनी सांगितले.