आरपीडी महाविद्यालयात होणार मतमोजणी : परिसरात 144 कलम लागू : मतमोजणीसाठी 1188 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पार पडले असून जिल्ह्यात एकूण 76.95 टक्के मतदान झाले आहे. आता मतमोजणी शनिवारी असून आरपीडी महाविद्यालय येथे होणार आहे. तेथेच स्ट्राँगरूम करण्यात आले असून या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूणच निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमध्ये एकूण 187 जण रिंगणात आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एका मतदारसंघासाठी 11 टेबल ईव्हीएम यंत्राद्वारे होणाऱ्या मोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. तर 2 टेबल हे पोस्टल मतदान मोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. आरपीडी महाविद्यालयाच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आरपीडी महाविद्यालयापासून बऱ्याच दूरवर समर्थकांना थांबावे लागणार आहे. जिल्ह्यामधील 18 मतदारसंघांमध्ये एकूण 39 लाख 47 हजार 150 मतदान आहे. त्यामध्ये 30 लाख 37 हजार 368 मतदान झाले आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. सर्वच मतदारसंघांची मतमोजणी आरपीडी कॉलेज येथे होणार असल्याने या परिसरात मोठी गर्दी होणार आहे.
उमेदवार आणि त्यांच्या पोलिंग एजंटना पास देण्यात आले आहेत. त्याची तपासणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे. मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाची आकडेवारी समजून घेण्यासाठी साऱ्यांचीच धावपळ उडणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 1188 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 828 जण तर मायक्रो ऑब्झरव्हर म्हणून 360 जणांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी केंद्रामध्ये थर्मल स्क्रिनिंग करूनच सवर्नां सोडले जाणार आहे. मतमोजणीसाठी सर्व ती तयारी केल्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर पाविर्ढिंगची सोयही मतदान केंद्रापासून काही अंतरावर करण्यात आली आहे.









