गोव्यातील काजूगर हा केवळ भारतात नव्हे तर विदेशातसुद्धा लोकप्रिय आहे. गोव्याचा काजूगर हा स्वादिष्ट तसेच रूचकर असतो. त्यामुळेच त्याला देश-विदेशात लोकप्रियता मिळाली आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेत राज्यात आज काजूगरांची बनावटगिरी सुरू आहे. त्यामुळे बदनामी होते ते गोव्याची. आज काजू व्यापारात बिगर गोमंतकीय मोठय़ा प्रमाणात उतरले आहेत व त्यांच्याकडूनच ही बनावटगिरी होत आहे.
आपल्याला वाटते काजू मूळचा गोव्याचा पण तसे नाही! गोव्यात काजू सर्वप्रथम आणला, तो पोर्तुगीजांनी. पोर्तुगीजांची या ठिकाणी राजवट असताना त्यांनी काजू, आंबा यासारखी फळे म्हणा किंवा त्यांची झाडे आणली व त्यांची लागवड केली पण येथील मातीत असलेल्या गुणवैशिष्टय़ांमुळे काजू व आंब्याची चव सर्वांनाच पसंत पडली. गोव्यात लागवड केल्या जाणाऱया काजूचा दर्जा हा उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे देश-विदेशात त्याला मागणी आहे मात्र आता गोव्याचा काजूगर म्हणून सांगून भलत्याच काजूगरांची विक्री याठिकाणी होऊ लागली आहे.
गोव्याच्या किनारपट्टी भागात काजूगरांची भली मोठी दुकाने सुरू झालेली आहेत. या दुकानात उपलब्ध होत असलेला काजूगर हा अस्सल गोव्याच्या मातीतला नव्हे तर तो अन्य राज्यातून आयात केलेला असतो. या काजूगरांना ना धड चव, ना स्वाद. तरीसुद्धा तो गोव्याचा काजूगर म्हणून त्यांची विक्री होत असते. अशा विक्रीतून ग्राहकांची फसवणूक होत आहे.
काजूगरांचा वापर आज अनेक खाद्यपदार्थांत केला जातो. ज्या खाद्यपदार्थांत काजूगर वापरला जातो, तो पदार्थ शाही होतो. पुलाव असो, रस्सदार भाजी असो, खीर असो की आईस्क्रीम. कुठल्याही पदार्थाला राजेशाही रुप द्यायचे असेल तर सोपी युक्ती म्हणजे वरून सुक्मयामेव्याचा वर्षाव करणे. जितके काजू जास्त, तितका तो पदार्थ मौल्यवान. हा काजू गोव्याच्या मातीतलाच असेल, याची खात्री मात्र कुणी देऊ शकणार नाही.
काजूचे झाड ब्राझीलमधले. 1568 सालच्या सुमारास साहसी पोर्तुगीज दर्यावर्दी नव्या नव्या भूभागांचा शोध लावत होते. तेव्हा ब्राझीलच्या ईशान्य भागातली ही झाडे त्यांच्या नजरेस पडली. काजूफळाची लाल-पिवळी बोंडं त्यांना आकर्षक वाटली. अजब प्रकार म्हणजे फळाच्या टणक बिया आत नसून बाहेर लटकलेल्या दिसत होत्या. तिथल्या ‘टुपी’ या आदिवासी जमातीचे लोक या बिया फोडून खात. गंमत म्हणजे त्यांनी हे ज्ञान तिथल्या जंगलातल्या वानरांकडून मिळविले होते. वानर एका विशिष्ट आकाराच्या दगडाने या बिया फोडून आतला गर खात असत. टुपी लोकांनीच पोर्तुगीजांना हे तंत्र शिकविले. एकदाची ती युक्ती जमली. पोर्तुगीजांना काजूगरांची चव फारच आवडली. मग आपल्यासोबत जहाजात बसवून त्यांनी काजूला सर्वत्र नेले. टुपी भाषेत या झाडाचे नाव ‘अकाजू’, त्याचेच पुढे झाले काजू.
आफ्रिकेचा पूर्वकिनारा, भारताचा पश्चिम किनारा, इथले हवा-पाणी, माती काजूच्या झाडाला मानवली. साल 1510 पासून गोव्यावर राज्य करणाऱया पोर्तुगीजांनी इथेही काजूची झाडे लावली. पुढे या झाडांचा आणखी एक फायदा त्यांना समजला. या झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. मग धो-धो पावसात जमीन धुपून जाऊ नये म्हणून काजूची लागवड गोव्यात मोठय़ा प्रमाणावर केली गेली. पेडणेपासून काणकोणपर्यंत काजूचे उत्पादन घेतले जाते. काजू बागायतीवर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. काजू हंगाम चांगला झाल्यास हातात चार पैसे खेळतात. त्यामुळे काजू उत्पादन हे गोव्यात महत्त्वाचे मानले जात आहे.
काजूच्या बोंडूपासून रस काढला जातो. त्यापासून ‘हुर्राक’ व ‘फेणी’ची निर्मिती केली जाते. गोव्याची काजू फेणी तर सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. अन्य राज्यात हुर्राक व फेणीची निर्मिती करण्यास बंदी असल्याने अद्याप हुर्राक व फेणीची बनावटगिरी होऊ शकलेली नाही. अन्यथा काजूगरांप्रमाणेच हुर्राक व फेणीची देखील बनावटगिरी झाली असती.
काजू बागायतीची मशागत करणे हे काम बरेच कष्टांचे असते. या कामांसाठी लागणारे मजूरदेखील गोव्यात उपलब्ध होत नाही. त्यामुळे काजू हंगामात अन्य राज्यातून कामगार आणावे लागतात. काजूला चांगला दर मिळावा, ही येथील शेतकऱयांची मागणी आहे पण विदेशातून मोठय़ा प्रमाणात काजूची आयात होऊ लागल्याने शेतकऱयांना अपेक्षित असा दर मिळत नाही. परिणामी काजू मशागतीवर केला जाणारा खर्च देखील भरून येत नाही.
काजूगरांची बनावटगिरी वाढल्याने भविष्यात त्याचा फटका येथील शेतकऱयांना बसण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यासाठी वेळीच उपाययोजना आखावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. गोव्याच्या काजूचे ब्रँडिंग करण्याची वेळ आता आलेली आहे. गोव्याच्या काजूचे ब्रँडिंग केल्यास बनावटगिरीला वाव राहणार नसल्याचे मत गोवा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केले आहे. गोव्यातील काजूगरांचे ब्रँडिंग करण्यासाठी सरकारचा पाठिंबा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
गोव्याच्या काजूचे ब्रँडिंग करताना काजूवर कोणत्या फॅक्टरीत प्रक्रिया केली व ती कधी केली, याची माहिती ग्राहकांसाठी उपलब्ध करावी लागणार आहे. ब्रँडिंग करण्यात आलेले काजू गोव्यात कुठल्या दुकानात उपलब्ध असेल, याचीही यादी तयारी करावी लागणार आहे. जेणेकरून ग्राहक त्या ठिकाणी भेट देऊन काजू खरेदी करू शकतील. जेव्हा गोव्याच्या काजूचे ब्रँडिंग होईल, त्याचवेळी बनावटगिरीवर नियंत्रण येईल व गोव्याची बदनामी थांबेल.
महेश कोनेकर








