नोएडा / वृत्तसंस्था
नोएडामधील सुपरटेक बिल्डरचे ट्विन टॉवर्स आज रविवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2ः30 वाजता केवळ दहा-बारा सेकंदात पाडण्यात येणार आहेत. सुमारे 3,700 किलो स्फोटकांच्या सहाय्याने काही सेकंदात हे ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त केले जाणार आहेत. यादरम्यान तेथे तैनात करण्यात येणाऱया पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. शनिवारी एडिफिसचे मालक जिगर चेड्डा यांनी ट्विन टॉवर पाडण्याच्या तयारीची माहिती देताना सर्व सज्जता पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. नॅशनल बिल्डींग कोडचा भंग केल्यामुळे सदर ‘ट्विन टॉवर’ उद्ध्वस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आणि सर्वोच्च न्यायालयाकडून ते कायम राखण्यात आले होते.
सुपरटेक ट्विन टॉवर पाडले जाणार असल्यामुळे नोएडा पोलिसांनी 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ड्रोनवर बंदी घातली आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तसेच एक्स्प्रेस वेच्या आजूबाजूला वाहतूक कर्मचारीही तैनात असतील. त्याचबरोबर 150 ते 200 वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय चार फायर इंजिन आणि डझनहून अधिक अग्निशमन दलाच्या गाडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. ट्विन टॉवर्स पाडण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
इमारत पाडण्यात येत असताना 15 मिनिटे आधी एक्स्प्रेस वेवर डायव्हर्जन सिस्टिम लागू केली जाईल. स्फोटानंतरची धूळ साफ होईपर्यंत नोएडा एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी यासाठी डायव्हर्जन प्लॅन जारी केला आहे. ट्विन टॉवरला जोडणाऱया सर्व मार्गांवर डायव्हर्जन लागू करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून या मार्गांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. या परिसरात असलेल्या एटीएस व्हिलेज आणि एमराल्ड कोर्ट या दोन सोसायटय़ांमध्ये राहणाऱया लोकांना शनिवारीच बाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात !
पाडकाम थांबवून रुग्णालय बांधण्याची मागणी
नोएडाच्या सुपरटेक ट्विन टॉवर्सचे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुंबईचे रहिवासी सीए गंगाराम लोकुमल चंदवानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाला ई-मेलद्वारे पाठवण्यात आली असून ती शनिवार सायंकाळपर्यंत सूचीबद्ध झाली नव्हती. या याचिकेत दोन्ही टॉवर पाडल्यास साहित्य, संसाधने आणि इतर गोष्टींचा अपव्यय होईल. अनेक लोक बेघर होतील. हा टॉवर पाडून त्याचे रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. किंवा या टॉवरचा वापर संरक्षण आणि शिक्षणासाठीही करण्याची सूचना केली आहे.









