प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक बदलीसाठीचे जिल्हास्तरीय कौन्सिलिंग सध्या सुरू आहे. हे कौन्सिलिंग रविवार दि. 16 रोजी संपणार असून त्यानंतर विभागीय स्तरावरील बदलीसाठीच्या कौन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. दि. 18 ते 25 जुलै दरम्यान बेळगावच्या बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात विभागीय स्तरावरील बदलीसाठीचे कौन्सिलिंग होईल. त्यामुळे ज्या शिक्षकांना जिल्हास्तरावर बदलीसाठीचे स्थान मिळाले नाही, त्यांना विभागीय स्तरावर स्थान मिळण्याची शक्यता आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षकांचे कौन्सिलिंग मागील वर्षभरापासून रखडले होते. मंगळवार दि. 11 पासून रविवार दि. 16 पर्यंत जिल्हास्तरावरील कौन्सिलिंग घेण्यात येत आहे. प्राथमिक विभागात 2 हजारहून अधिक शिक्षकांची बदली झाली आहे. सध्या हायस्कूल विभागाचे कौन्सिलिंग सुरू असून हे कौन्सिलिंग रविवारपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
जिल्हास्तरावरील कौन्सिलिंग पूर्ण झाल्यानंतर विभागीय स्तरावरील बदलीसाठीचे कौन्सिलिंग होणार आहे. यामध्ये मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक, सहशिक्षकांचा समावेश असणार आहे. यावर्षी प्रथमच बेळगावमध्ये बी. के. मॉडेल शाळेत कौन्सिलिंगची प्रक्रिया पार पाडली जात आहे. बेळगावसह उत्तर कन्नड, हावेरी, बागलकोट, विजापूर, धारवाड व गदग येथील शिक्षक विभागीय स्तरावरील बदलीसाठी बेळगावमध्ये येणार आहेत.
शिक्षण विभागाने विभागीय स्तरावरील बदलीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक शिक्षकाला क्रमांक दिले असून त्यानुसार दररोज काही प्रमाणात बदलीसाठीचे कौन्सिलिंग होणार आहे. बऱ्याच शिक्षकांना जिल्हास्तरीय कौन्सिलिंगमध्ये बदलीसाठी जागा उपलब्ध झाल्या नव्हत्या. परंतु, आता विभागीय स्तरावर बदलीसाठी जागा उपलब्ध होणार आहेत. ज्या शिक्षकांना इतर जिल्ह्यांमध्ये जाणे शक्य आहे, त्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.









