विषय शिक्षकांचे तालुकास्तरावर कौन्सिलिंग
बेळगाव : शिक्षक बदली प्रक्रियेसाठी मंगळवारपासून कौन्सिलिंगला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी तालुकास्तरावरील शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले. क्लब रोड येथे जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात कौन्सिलिंगसाठी सकाळपासूनच शिक्षकांची गर्दी झाली होती. शारीरिक शिक्षक वगळता इतर सर्व विषय शिक्षकांचे तालुकास्तरावर कौन्सिलिंग झाले. शिक्षक बदलीची प्रक्रिया मागील वर्षभरापासून रखडली होती. नवीन तारखानुसार शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवाकंदील मिळाला. मंगळवारपासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या कौन्सिलिंगला प्रारंभ झाला. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी कौन्सिलिंगसाठी गर्दी केली होती. जिल्हाशिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी स्वत: या कौन्सिलिंग प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. अतिरिक्त शिक्षकांना ज्या-ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत, याची माहिती मोठ्या स्क्रीनवर दाखविली जात होती. शिक्षकांना हवी असणारी जागा दिली जात होती. बेळगाव शहर व तालुकास्तरावर पहिल्या दिवशीचे कौन्सिलिंग करण्यात आले. यामुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला.
अतिथी शिक्षकांचा आनंद काही दिवसांपुरताच! : अतिरिक्त शिक्षक रुजू झाल्याने नाराजी
ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या शाळांवर अतिथी शिक्षकांच्या नेमणुका आठवड्याभरापूर्वीच करण्यात आल्या होत्या. यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. परंतु हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या नेमणुका अतिथी शिक्षकांच्या जागी करण्यात आल्याने अतिथी शिक्षकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती. त्यामुळे त्याठिकाणी अतिरिक्त शिक्षक नेमण्यासाठीचे आदेश शिक्षण विभागाने दिले. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. शाळांवर रुजू होऊन केवळ आठ दिवस होतात तोवर त्यांच्यावर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. अतिथी शिक्षक म्हणून नेमणूक झाल्याने किमान पुढील वर्षभर महिना 10 हजार रुपये पगार मिळेल, या अपेक्षेने त्यांनी नोकरीला सुरुवात केली. परंतु आठवड्याभरातच त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला. राज्यातील शिक्षक बदली प्रक्रियेला मागील वर्षभरापासून ब्रेक लागला होता. मंगळवारपासून जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली. अतिरिक्त शिक्षकांना ज्या-ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.
अतिथी शिक्षकांचा हिरमोड
मंगळवारी दुपारनंतर अतिरिक्त शिक्षकांच्या नेमणुका झाल्याची माहिती शाळांपर्यंत पोहोचली. यामुळे अतिथी शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. शिक्षकांच्या नेमणुका करायच्या होत्या तर अतिथी शिक्षक भरूनच का घेतले? असा प्रश्न विचारण्यात येत होता. काही महिला अतिथी शिक्षकांनी तर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करत नाराजी दर्शविली.









