बुधवारी 283 उमेदवारांना मिळाली शाळा निवडण्याची मुभा
बेळगाव : शिक्षक भरती प्रक्रियेसाठी बुधवारी बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात कौन्सिलिंग घेण्यात आले. एकूण 283 पात्र उमेदवारांचे बुधवारी सकाळपासून कौन्सिलिंग सुरू होते. मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता. रिक्त असलेल्या जागा व विद्याथ्यर्च्यां पटसंख्येनुसार शिक्षकांना शाळा दिल्या जात होत्या. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 592 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 13,500 शिक्षकांपैकी 592 शिक्षक बेळगाव जिल्ह्याला मिळणार आहेत. सोमवारी 309 शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण झाले. तर उर्वरित 283 शिक्षकांचे बुधवारी कौन्सिलिंग झाले. जिल्हाभरातील शिक्षक कौन्सिलिंगसाठी बुधवारी सकाळपासून आपल्या कुटुंबीयांसमवेत हजर होते. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना स्क्रीनवर शाळा निवडण्याची मुभा देण्यात आली. मागील वर्षभरापासून रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी समाज विज्ञान विषयाच्या कन्नड माध्यमाच्या 243 उमेदवारांचे कौन्सिलिंग झाले. तर मराठी माध्यमाच्या 33, उर्दू माध्यमाच्या 7 शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले. जीवशास्त्र विषयासाठी कन्नड माध्यमातून 26, मराठी माध्यमातून 3, उर्दू माध्यमातून 6 तर इंग्रजी माध्यमाच्या 121 शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले.
एसडीएमसी अध्यक्षाची दादागिरी
बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात बुधवारी मराठी शिक्षकांचे कौन्सिलिंग झाले. यावेळी तालुक्यातील एका शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षाने भावी शिक्षकावर दादागिरी करत ‘तू आमच्या शाळेवर नियुक्त होऊ नकोस. आम्हाला एका सक्षम शिक्षकाची गरज असून तू दिव्यांग असल्याने आमच्या शाळेचे नुकसान होईल’, अशी धमकी भावी शिक्षकाला दिली. यामुळे उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.