पालकमंत्र्यांसमोर बैठकीत समस्या मांडल्या नसल्याने नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही नगरसेवकांसह जनतेनेही तक्रारी दाखल केल्या. अनेक तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या होत्या. सभागृहामध्ये तक्रारी दाखल करत असताना काही नगरसेवक मात्र आपल्या समस्याच मांडण्यास पुढे आले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये कोणतीच समस्या नाही का? याचबरोबर तक्रारी न मांडण्यामागचे नेमके कारण काय? याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी दाखल केल्या. पाणी समस्येबाबत तर अक्षरश: तक्रार करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र काही नगरसेवकांनी पाणी समस्या तसेच इतर समस्या असतानाही पालकमंत्र्यांसमोर तक्रारी मांडल्या नाहीत. यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आपल्या भागातील समस्या निवारण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिले जाते. जनतेच्या समस्या असताना नगरसेवक पालकमंत्र्यांसमोर त्या समस्या मांडत नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. समस्या मांडल्याशिवाय सुटणार कशा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरातील बहुसंख्य प्रभागांमध्ये मोठमोठ्या समस्या आहेत. याबद्दल सर्वसामान्य जनता नगरसेवकांकडे जाऊन तक्रारी मांडत आहे. मात्र नगरसेवक महापालिकेमध्ये तक्रारी मांडत नाहीत. हेच जनतेचे दुर्दैव आहे. वास्तविक नगरसेवकांनी बुधवारच्या बैठकीमध्ये आपल्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे, यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.