स्वर्गात एकदा धावपळ सुरू झाली. इंद्रदेव खूप रागवले होते. कुणाला काही कळेना. त्यांनी फर्मान सोडलं होतं की स्वर्गाची शोभा वाढवायला कापसाची फुलं घेऊन या. आता कापसाची फुलं आणायची तर पृथ्वीवर जायला हवं. कारण पृथ्वीवरच्या शेतात कापसाची पीकं छान आनंदात डोलत होती. पण हे काम कोणी करायचं? सगळेजण एकमेकांवर ढकलू लागले. वारा म्हणाला मी आणू शकतो पण माझ्या बरोबर उडता उडता ती नीट येणारच नाही. डोंगर म्हणाले मी आणले असते पण मी एका जागी हलतच नाही मग काय करावं बरं. मग शेतालाच विचारलं शेत म्हणालं मी देईन तुला. माझ्यासारखे दिसणारे दुसरं काहीतरी फुल घेऊन जा. आता पुन्हा प्रश्न आला. शेवटी वाऱ्याने ढगांची गाडी केली आणि ती ढकलत ढकलत खाली आणायला सुरुवात केली तर आपले नेहमीप्रमाणे तरंगत तरंगत खाली आले पण ते नेमके समुद्राजवळ आले. त्यांनी समुद्राला विचारलं ‘अरे बाबा कापसाच्या फुलासारखी फुलं करून देशील का’. समुद्राच्या लाटा आनंदाने उड्या मारत आल्या. त्यामुळे ‘हो हो देऊतर, देवबाप्पास द्यायचेत ना, आम्ही नक्की देऊ’. पण थोडं थांबायला लागेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी सूर्याला विनंती करावी लागेल. सगळ्यांनी सूर्याला विनंती केली. तसे थांबा म्हणाला आलोच मी आणि मग सूर्याची प्रखर किरणे लाटांवर पडली आणि लाटांची वाफ व्हायला सुरुवात झाली. या प्रत्येक वाफेचं छोटं छोटं फुल तयार झालं. सगळी फुले बसली ढगांच्या गाडीत आणि मग वाऱ्याने ती गाडी ढकलत ढकलत आणली. लाटा बारीक बारीक कणाच्या रुपात त्या फुलांमध्ये बसल्या होत्या. वरती गाडी आल्यावर देवबाप्पाला आनंद झाला. सगळे ढग इकडे तिकडे आनंदाने उड्या मारू लागले पण असं करता करता खूप फुले यायला लागली. खूप गाड्या फुलं भरून यायला लागली. आता ह्या सगळ्यांना ठेवायचं कुठे. सगळी एकमेकांच्या पुढे दाटीवाटीने उभी राहू लागली आणि मग पांढरे शुभ्र दिसणारे ढग एकमेकांच्या पुढे उभे राहिल्यामुळे काळ्या रंगाचे दिसायला लागले. खरं म्हणजे ढग पांढरेच असतात. पण आम्हाला मात्र काही वेळेला ते काळे झालेले दिसतात. असं झाल्यानंतर वारा सुद्धा आनंदाच्या भरात नाचत होता. नाचता नाचता तो सगळ्या ढगांना ढकलत होता. शाळा भरताना मुलं दंगा करतात ना अगदी तस्सं. त्याच्यामुळे झालं काय, या छोट्या पांढऱ्या कापसाच्या फुलांमध्ये बसलेले पाण्याचे कण होते ना, ते एकमेकांवर आदळू लागले आणि त्या पांढऱ्या फुलातून पाय घसरून पडायला लागले. ते घसरून पडायला लागल्यानंतर सगळ्यांना हसू यायला लागलं. घाबरून प्रत्येकाने एकमेकांचे हात धरले, जणू मोत्यांची माळच, आता झाडांची पानं म्हणू लागली… या या खाली आम्ही तुम्हाला झेलतो. झाडाच्या पानांनी हात पसरले आणि त्याच्यावरती एक एक थेंब येऊन पडू लागला. पण वरून जोरात पळत आल्यामुळे पुढे पुन्हा पानावरून खाली मातीत घसरले, माती आपले हात पसरून बसली होती. सगळ्या थेंबांना तिने कुशीत घेतलं आणि सगळं शांत केलं. अशाप्रकारे कापसाच्या फुलांचा पाऊस तयार झाला आणि सगळ्या पृथ्वीला आनंद झाला. कारण जमिनीत गेलेलं पाणी पुन्हा वाफेच्या रूपात घेऊन जायला सूर्याची किरणं सज्ज झाली होती. समुद्राच्या पाण्याच्या रूपात पुन्हा पुन्हा परत पृथ्वीवर येणारच होती.
Previous Article194 धावांच्या आघाडीसह इंग्लंड सुस्थितीत
Next Article चीनच्या बीआरआय प्रकल्पात नेपाळचा अधिकृतपणे समावेश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








