महिलांसाठी पर्वणी ; स. का. पाटील सिंधुदुर्ग आणि गवाणकर महाविद्यालयाचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) –
स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५-२६ निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने “वीरांगना – भारतातील शूर स्त्री योद्ध्या” वेशभूषा स्पर्धा विद्यार्थिनी व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक शूर स्त्रियांनी आपल्या शौर्य, त्याग आणि पराक्रमामुळे प्रेरणादायी ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शुक्रवार ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत वय वर्षे १५ पुढील सर्व विद्यार्थिनी, महिला सहभागी होऊ शकतात. यातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ 3 पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनी आपण निवडलेल्या वीरांगनेची वेशभूषा सादर करायची आहे, तसेच निवडलेल्या वीरांगनेबद्दल एखादा संवाद किंवा माहिती सादर करायची आहे. या साठी प्रत्येक स्पर्धकाला एका मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबर २०२५ पूर्वी डॉ. उज्वला सामंत (मो. ९४२१२६१४३९) यांच्याकडे नावनोंदणी करावी. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी याच क्रमांकावर संपर्क साधावा.समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय क्यू ए सी प्रमुख डॉ. सुमेधा नाईक व प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी सर्व विद्यार्थिनी व मालवण पंचक्रोशीतील महिलांना उत्साहाने सहभाग नोंदवून भारतीय शौर्यपरंपरेचा गौरव वाढविण्याचे आवाहन केले आहे.









