के.आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : रत्नाकर के. शेट्टी स्पोर्टस फौडेशन आयोजित राहुल के.आर. शेट्टी चषक निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून शिवाजी कॉलनीने खानापूरचा, साईराजने सिटी स्पोर्टसचा, कॉसमॅक्सने युनायटेड गोवन्सचा, सिटी स्पोर्टसने स्वस्तीकचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रज्वल, कृष्णा मुंचडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित केलेल्या के. आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शिवाजी कॉलनी संघाने खानापूर युनायटेड संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला शिवाजी कॉलनीच्या अमान किल्लेदारच्या पासवर कृष्णा मुचंडी याने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात खानापूरच्या पंतोजीने गोल करण्याची सुवर्णसंधी वाया दवडली. 55 व्या मिनिटाला खानापूर युनायटेडच्या बचाव फळीच्या खेळाडूने चेंडू बाहेर काढण्याच्या नादात चेंडू सरळ आपल्या गोलमुखात मारल्याने शिवाजी कॉलनीने 2-0 ची आघाडी मिळवली.
दुसऱ्या सामन्यात साईराजने सिटी स्पोर्ट्सचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या टिकीने गोल करण्याची नामी संधी दवडली. 28 व्या मिनिटाला साईराजच्या अमितने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 47 मिनिटाला साईराजच्या ओंमकारच्या पासवर प्रज्वलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळविली. त्यानंतर सिटी स्पोर्ट्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आहे. मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कॉसमॅक्सने युनायटेड गोवन्सचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 27 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या जॉयचंदच्या पासवर अॅलेबीने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात युनायटेड गोवन्सच्या शाहीदने गोल करून 1-1 अशी बरोबरी करत सामन्यात रंगत निर्माण केली. 53 व्या मिनिटाला अॅलेबीच्या पासवर जॉयचंदने दुसरा गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात सिटी स्पोर्ट्सने स्वस्तीकचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात सिटी स्पोर्ट्सच्या विकासच्या पासवर टीकीने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 61 व्या मिनिटाला टिकीच्या पासवर विकासने दुसरा गोल केला. तर 63 व्या मिनिटाला विकासच्या पासवर टिकीने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी सिटी स्पोर्ट्सने मिळविली. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कृष्ण मुचंडी व प्रज्वल लाड यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.









