वृत्तसंस्था/ होबार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या होबार्ट आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत नवोदित एलिसाबेटा कोसीरेटोने एकेरीची अंतिम गाठताना उपांत्य सामन्यात सोफिया केनिनचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात कोसीरेटोने केनिनचा 7-5, 4-6, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या पराभवामुळे माजी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम विजेती केनिनला तब्बल तीन वर्षांनंतर डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी हुकली. 2020 साली केनिनने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर वारंवार दुखापती आणि प्रकृती नादुरुस्तीमुळे तिला टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. येत्या सोमवारपासून मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे. 2019 साली केनिनने होबार्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती. दुखापतीमुळे या स्पर्धेतून स्पेनच्या पाओला बेडोसाने उपांत्यफेरी अर्धवट सोडत माघार घेतली.









