केदनूर-मण्णिकेरी ग्रामस्थांची जिल्हा पंचायतकडे कारवाईची मागणी
बेळगाव : केदनूर ग्रा. पं. मध्ये 2021-2024 या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. नरेगा आणि इतर योजनांमध्ये बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केदनूर आणि मण्णिकेरी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे दिले आहे. केदनूर ग्रा. पं. मध्ये मण्णिकेरी गावचाही समावेश आहे. मात्र या दोन्ही गावच्या विकासकामांमध्ये गैरप्रकार घडला आहे. नरेगा योजना, 14 वा वित्त आयोग आणि 15 व्या वित्त आयोग अंतर्गत कामे राबविल्याचे भासवून पैसे उकळण्यात आले आहेत. विकासकामे न करताच बनावट बिले तयार करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे.
नरेगा योजनेंतर्गत कामावर गेल्याचे दाखवून कामगारांचे पैसे लाटण्याचा प्रकार घडला आहे. केदनूर येथील एका शेतकऱ्याला विहीर मंजूर झाल्याचे सांगून यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे तयार करून पैसे काढण्यात आले आहेत. त्याबरोबर रोपांना पाणी देण्याच्या नावाखाली बोगस बिले तयार करून 20 लाख रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला असल्याचे दाखविण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा गैरवापर झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी मारुती सनदी, रामा राजाई, भरमा सनदी, शंकर वर्गे, जे. एल. पाटील, केदारी राजाई, शामू संभाजी, एस. के. राजाई, मारुती कलखांब, एन. पी. पुजारी, जी. एन. सुतार आदी उपस्थित होते.









