सांगली :
मिरज येथील शामराव बंडुजी पाटील दुय्यम बाजार आवार शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देताना नियमांचे उल्लंघन करुन भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणात बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी केला .
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सांगली बाजार समितीबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला. मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर देताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु कार्यवाही झालेली नाही. यामध्ये सांगली बाजार समितीचे सभापती, सचिव आणि संचालक मंडळही जबाबदार आहे. सभापती आणि सचिव यांचाही भ्रष्टाचारात वाटा असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करून कारवाई झाली नसल्याने येत्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे लालबेग यांनी दिला आहे. यावेळी हितेश राक्षे, बापू देशमुख, शरद यमगर, तुकाराम बनसोडे, आश्रफ कारभारी, गणेश मोरे, विजय मोरे व शिवसैनिक उपस्थित होते.








