येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्षांची जि. पं. कडे तक्रार : सीईओंकडून चौकशीची सूचना : घरोघरी पाणीपुरवठा योजनेसाठी 5 कोटीहून अधिक निधी खर्ची
बेळगाव : येळ्ळूर येथे घरोघरी पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून अवैज्ञानिकरितीने योजना राबविण्यात आल्याने गावात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. याची तातडीने चौकशी करण्यात यावी व योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांची भेट घेऊन केली. जलजीवन मिशनअंतर्गत येळ्ळूर येथे जवळपास 5 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, योजना राबविताना अधिकाऱ्यांकडून वैज्ञानिकदृष्ट्या विचार करण्यात आलेला नाही. यामुळे गावात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. गावामध्ये यापूर्वी जलनिर्मल योजनेंतर्गत पाईपलाईन घालण्यात आली होती. सदर पाईपलाईनचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडथळा निर्माण होत आहे. जलजीवन मिशन योजना राबविताना ग्रा. पं. सदस्यांना व गाव पाणीपुरवठा समितीला विश्वासात न घेता योजना राबविण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पाण्याची समस्या व अडथळे जाणून न घेताच कंत्राटदाराकडून योजना राबविण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या या मनमानी कारभारामुळे गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. योजना राबवूनही ती निरुपयोगी ठरली आहे, अशी तक्रार करण्यात आली. सीईओ हर्षल भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करून समस्या जाणून घेण्याची तत्काळ सूचना केली आहे.
काम अर्धवट असल्यास बिल थांबविण्यात येईल
कामाची तातडीने पाहणी करून समस्या दूर करू, कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी करून योजनेचे काम अर्धवट असल्यास बिल थांबविण्यात येईल.
– हर्षल भोयर (जि. पं. कार्यकारी अधिकारी)
कंत्राटदाराने मर्जीनुसार योजना राबविली
कंत्राटदाराला अनेकवेळा सूचना करूनही गावातील समस्या जाणून घेतल्या नाहीत. मर्जीनुसार योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा करताना अडचण निर्माण होत आहे. स्थानिकांचे मत जाणून घेण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे.
– सतीश पाटील, (ग्रा. पं. अध्यक्ष, येळ्ळूर)









