रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष-अधिकाऱ्यांचा सहभाग : भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
खानापूर : तालुक्यातील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानात गेल्या काही वर्षापासून प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून यात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराना शासकीय धान्यांचे वितरण करणारी संस्था नंदगड मार्केटिंग सोसायटी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आणि तालुका अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, पंचहमी योजनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, सुरेश जाधव, अर्बन ब्लॉकचे अध्यक्ष महांतेश राऊत, सावित्री मादार, लक्ष्मण मादार, गुड्डुसाब टेकडी, रुद्राप्पा पाटील, प्रियांका गावकर, विवेक तडकोड, इसाकखान पठाण, शांताराम गुरव यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराची पुराव्यानिशी माहिती देताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून तालुक्याचा पंचहमी योजनेच्या सदस्याना घेऊन दौरा केला असता, ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणात तक्रारी सांगितल्या. यानंतर याबाबत सखोल चौकशी करून कागदपत्रे जमा केली आहेत. प्रत्येक दुकानदाराला दीडशे किलो तांदूळ कमी देण्यात येतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तालुक्यात 138 दुकाने आहेत. या दुकानांचा दीडशे किलोप्रमाणे तांदूळ जातो कुठे? याबाबत संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. याला तालुका अन्नपुरवठा अधिकारी पाठिशी घालत आहेत. याचाच अर्थ त्यांचाही यात सहभाग आहे. असा आमचा आरोप आहे.
काटामारीचा फटका सर्वसामान्यांना
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, दुकानदाराना तांदळाचा पुरवठा कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात काटामारी करण्यात येते. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी जिल्हा अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे आम्ही निवेदन दिले आहे. मार्केटिंग सोसायटीमधून प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, जर येत्या आठ ते दहा दिवसात कारवाई झाली नसल्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या, नागरी अन्नपुरवठा मंत्री के. एच. मुनिअप्पा यांची भेट घेऊन कागदपत्रानिशी पुरावे सादर करून कारवाईची मागणी करणार आहोत.
मार्केटिंग सोसायटीच्या वितरणाची सखोल चौकशी करा
महांतेश राऊत म्हणाले, तालुक्यातील ग्रामीण भागात नऊ ते दहा ठिकाणी अध्यक्षांतर्फे रेशन वितरण करण्यात येते. यातही मोठा घोटाळा आहे. महादेव दळवी यांच्यामार्फत रेशन वितरणात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. यासाठी महादेव दळवी आणि मार्केटिंग सोसायटीच्या वितरणाची सखोल चौकशी करावी. अन्नभाग्य योजनेतील खाली पोत्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार आहे. यासाठी अन्नपुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी आणि धान्य वितरणाचा इतर संघ, संघटनांना परवाना द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे नेते सुरेश जाधव म्हणाले, तालुक्यात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू आहे. काँग्रेसने सखोल चौकशी करून भ्रष्टाचाऱ्याच्या पुराव्यानिशी आरोप करत आहोत. याबाबत तालुक्याच्या आमदारानी आपली भूमिका स्पष्ट करावी.









