वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेत बनावट जॉब कार्डांच्या माध्यमातून करण्यात येणारा मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे. आतापर्यंत देशभरात अशी 7 लाख 43 हजार बोगस कार्डे रद्द करण्यात आली आहेत. अशी कार्डे रद्द करण्यात उत्तर प्रदेश सरकारने आघाडी घेतली असून या राज्यात 2.96 लाख कार्डे रद्द झाली. ही माहिती केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिली.
लोकसभेत शुक्रवारी ही माहिती प्रश्नोत्तरांच्या तासात देण्यात आली. गेल्या वर्षीही 3 लाख 6 हजार 944 बनावट कार्डे रद्द करण्यात आली होती. आंध्र प्रदेशात 46 हजार 622 तर राजस्थानात 45,646 कार्डे रद्द करण्यात आली आहेत. तसेच कार्डे रद्द करण्यात ओडीशाचा क्रमांक दुसरा असून त्या राज्यात ही संख्या 1,14,333 तर मध्यप्रदेशात 27,859 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक वर्षी रोजगार कार्डांची तपासणी केली जात असून बोगस कार्डे रद्द करण्याची प्रक्रिया सातत्याने होत आहे. तसेच नवी कार्डे वितरीत करण्याची प्रक्रियाही होत आहे. 2022-2023 या वर्षात आतापर्यंत 64 लाख 47 हजार 345 नवी कार्डे वितरीत करण्यात आली आहेत. त्याच्या मागच्या वर्षात 1,20,63,967 नवी कार्डे वितरीत करण्यात आली होती हे स्पष्ट करण्यात आले.









