महिला-बाल कल्याण खात्याचे दुर्लक्ष : अंगणवाडीतील गरीब मुले आहारापासून वंचित, जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने मुलांना पोषक आहार देण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून मध्यान्ह आहार सुरू केले. मात्र या मध्यान्ह आहारामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एक तर त्याचा पुरवठा करणारी एजन्सीच योग्य प्रकारे पुरवठा करत नाहीत. धान्याचा दर्जा निकृष्ट असतो. त्यानंतर पुरवठा करताना त्यामध्ये कपात केली जाते. त्यावर कहर म्हणजे काही ठिकाणच्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसदेखील त्यामधील धान्याची विक्री करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अंगणवाडीतील बालकांना पुरविल्या जाणाऱया पोषक आहारासाठीचे धान्य बेकायदेशीररित्या विकले जात असल्याचे प्रकार अनेकदा उजेडात आले आहेत. यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट महिला व बालकल्याण खात्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यासाठी आता महिला आणि बालकल्याण खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडय़ांना पोषक आहार पुरविण्याबाबत सरकार प्रयत्न करत असते. मात्र पुरवठा करतानाच मोठा भ्रष्टाचार होत आहे. दरमहिन्याला धान्य पुरविले जाते. मात्र ते अंगणवाडय़ांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनाला येऊ लागले आहे. जरी अंगणवाडीपर्यंत पोहोचले तरी ते बालकांपर्यंत पोहोचतेच असे नाही. प्रकल्पाधिकारी व इतर पर्यवेक्षिकांना या प्रकाराची माहिती असते. बऱयाचदा हीच मंडळी छुपा पाठिंबा दर्शवू लागली आहेत, असा आरोप होत आहे. मात्र याकडे लक्ष देण्याची जबाबदारी असलेली मंडळीच हात झटकू लागली आहेत. यामुळे पालकांतून तसेच विविध संघटनांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
धान्याची थेट बाजारात विक्री
संपूर्ण बेळगाव जिल्हय़ात हा गैरव्यवहार सुरू आहे. अनेक ठिकाणी हा प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. आहार पुरविण्याची जबाबदारी असणारे कंत्राटदार हे धान्य थेट बाजारात विकू लागले आहेत. विशेषतः कुपोषण निर्मूलनासाठी उपलब्ध होणारा आहारही बाहेर विकला जात आहे. त्यामुळे या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. तेव्हा याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याबरोबरच जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गैरप्रकारामुळे सरकारचे नुकसान
अंगणवाडय़ांना पाठविण्यात येणाऱया या जिन्नसांची विक्री बाजारपेठेमध्ये केली जात आहे. शहरातील रविवारपेठ परिसरात विक्री करण्यासाठी अनेक महिला येत असल्याचेही बोलले जात आहे. गूळ, तांदूळ व इतर वस्तू त्या विक्री करण्यासाठी घेऊन येतात. त्यानंतर विक्री करून त्या निघून जातात. याचबरोबर बऱयाचदा कंत्राटदार अंगणवाडय़ांना देण्याचा माल परस्पर आपल्या स्वतंत्र गोदामांमध्ये घेऊन जात असून पुढे या मालाची विक्रीही बेळगाव, धारवाड व हुबळीसह महाराष्ट्रातील बाजारात होऊ लागली आहे. या गैरप्रकारात सरकारचे नुकसान आहेच. मात्र अंगणवाडीतील गरीब मुले या आहारापासून वंचित राहत आहेत. या गैरप्रकारामध्ये वरि÷ांपासून अंगणवाडी शिक्षिकांपर्यंत सहभाग असल्याचा आरोप होत आहे.









