केआरएस पक्षाकडून चौकशी करण्याची मागणी
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील अमटूर ग्राम पंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अमटूर ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमध्ये अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. तर यामध्ये मोठा भ्रष्टाचारही झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीकडून 2019 मध्ये 76 हजार, 40 हजार, 85 हजार, 70 हजार, 2020 मध्ये 3 लाख अशाप्रकारे निधी खर्च केला आहे. एकाच योजनेसाठी अशाप्रकारे वारंवार निधी खर्च करून केलेली विकासकामेही निकृष्ट दर्जाची ठरली आहेत. एकाच योजनेसाठी इतक्या वेळा निधी खर्च करण्यात आल्याने योजनेत गैरकारभार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे खर्च करण्यात आलेल्या निधीच्या माहितीवरून यामध्ये गैरकारभार झाल्याचे स्पष्ट होते. यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. यामध्ये ग्रा. पं. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचाही सहभाग असल्याचा संशय आहे. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्राम पंचायतीला भेट देऊन चौकशी करावी, अशी मागणी केआरएस पक्षातर्फे करण्यात आली आहे.









