प्रतिनिधी / बेळगाव : सध्याचे राज्यातील सरकार हे भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालून शेतकर्यांवर अन्याय करीत आहे. 40 टक्के कमिशनचे सरकार म्हणून राज्य सरकारची सर्वत्र बेअब्रु झाली आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यानी तक्रार दाखल केली हे प्रकरण एसीबीकडे असून त्यांची चौकशी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यावरून भ्रष्टाचार करणार्या आपल्या लोकप्रतिनिधींना सरकार पाठिशी घालत असल्याचा घणाघाती आरोप आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष भास्कर राव यांनी केले.
भ्रष्टाचार करणार्याविरोधात आप काम करत आहे. बेळगावमध्ये आमदार अभय पाटील यांच्या विरोधात काम करणार्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात येत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये काही अधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी आहेत. त्यामुळे या सर्व भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फेत चौकशी करावी, अशी मागणी आपच्या उत्तर विभागाचे प्रभारी राजू टोपण्णावर यांनी केली.