केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती : केंपवाड येथे भाजपची प्रचारसभा

कागवाड : काँग्रेसच्या कार्यकाळात देश ‘पारतंत्र्या’त गेल्यामुळेच राहुल गांधी यांना पुन्हा भारत जोडो कार्यक्रम हाती घ्यावा लागला, असा आरोप केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी येथे केला. तसेच भारत जोडो यात्रेतून त्यांनी काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने देशाला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले होते, असेही ते म्हणाले. सद्यस्थितीत देशाला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे शक्य झाले आहे. विविध भ्रष्टाचाऱ्यांचा काळा पैसा जप्त करत देशाच्या हिताचा व विकासाचा विचार भाजप सरकार करत आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. बुधवारी केंपवाड येथे कागवाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार व आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. सदर सभा अथणी साखर कारखान्याच्या क्रीडांगणावर पार पडली. मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते देशसेवा व जनसेवा करण्यात फारच मागे होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार करून बेकायदा संपत्ती जमा केली. अशांकडून 5 हजार कोटींची बेकायदा संपत्ती जप्त करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. मोदी यांच्या 9 वर्षाच्या काळात 1 लाख 10 हजार कोटींची बेकायदा संपत्ती जप्त केली आहे. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जगाने सर्वश्रेष्ठ मानली आहे. त्यामुळे 2027 पर्यंत भारत देश महासत्ता होणार आहे, यात शंका नाही. केंद्र व राज्यात डबल इंजिन भाजपची सत्ता आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. त्यात श्रीमंत पाटील हे मंत्री असतील, असा विश्वासही मंत्री सिंग यांनी व्यक्त केला.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरी केंद्र सरकारच्या योजना पोहचवल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन यासह अनेक योजनांचे लाभ जनतेला मिळाले आहेत. त्यामुळेच यंदाही भाजपचे सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील म्हणाले, माझ्या राजकीय जीवनामध्ये कोणतेही जातीयतेचे राजकारण केलेले नाही. पक्षभेद मानला नाही. समाजसेवा हेच कर्तव्य म्हणून काम केले. मतदारसंघाचा विकास साधण्यात आपण यशस्वी झालो आहोत, यापुढेही आणखीन एकदा काम करण्याची आपण संधी देताना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस अॅड. अभयकुमार अकिवाटे, कागवाड भाजप विभागाचे अध्यक्ष तमन्ना पारशेट्टी, भाजपचे निरीक्षक गुंडाप्पा भेंडवाडे, उत्तम पाटील, बसगेंडा पाटील, उज्ज्वला शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.









