15 ऑगस्टपर्यंत चरी बुजविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे
बेळगाव : शहरात 24 तास पाणी योजनेसाठी खोदलेल्या चरी गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी करूनदेखील एलअँडटीने दुर्लक्ष केल्याने नगरसेवक शंकर पाटील यांनी गुरुवारी विश्वेश्वरय्यानगर येथील एलअँडटीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत चरी बुजविल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नगरसेवक शंकर पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
पुणे-मुंबईच्या धरतीवर बेळगावातदेखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील देखावे व गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. मात्र एलअँडटीकडून 24 तास पाणी योजनेच्या नावाखाली गल्लीबोळात खोदकाम करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून केलेले काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. चरीमध्ये केवळ माती ओढली जात आहे. पण चरीवर डांबरीकरण किंवा काँक्रीट घातले जात नाही. त्या चरीत वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी 1 ऑगस्टपर्यंत प्रभाग क्र. 7 मधील विविध गल्लीतील चरी बुजवाव्यात, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी केली होती. पण आतापर्यंत केवळ गवळी गल्लीतील चरीवर खडी टाकून ती बुजविण्यात आली आहे. यानंतर कंग्राळ गल्लीत काम हाती घेण्यात आले आहे. पण गणेशोत्सवाला केवळ 20 दिवस राहिल्याने उर्वरित 12 गल्लीतील चरी बुजविण्यात आले नसल्याने गुरुवारी नगरसेवक शंकर पाटील यांनी विश्वेश्वरय्यानगर येथे एलअँडटीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे एलअँडटी अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत चरी बुजविल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.









