बेळगाव : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 33 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या संकट भत्त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षाविरोधात सरकार नियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी मंगळवार दि. 10 रोजी उपोषण सुरू केले आहे. महापालिकेच्या 629 कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना हक्काचे पैसे अद्याप महापालिकेकडून देण्यात आलेले नाहीत, असा आरोप करत त्यांनी हे उपोषण हाती घेतले आहे. महापालिकेत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 33 महिन्यांचा संकट भत्ता अद्याप प्रलंबित आहे, असे सांगत दिनेश नाशिपुडी यांनी आरोग्य खात्याच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला.
या घटनेचा निषेध करत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्यासमोर उपोषण सुरू केले आहे. संबंधित फाईल्स तयार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संकट भत्त्यासाठी अंदाजे 4 कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे. यामध्ये कायमस्वरुपी काम करणाऱ्या 257 कर्मचाऱ्यांची यादी महसूल विभागाला सादर करण्यात आली आहे. मात्र कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 32 कर्मचाऱ्यांची यादी अद्याप तयार झालेली नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला 33 महिन्यांचा भत्ता मिळून 66 हजार रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या नव्या आयुक्त शुभा बी. भत्ता देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र आरोग्य विभागाच्या विलंबामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रलंबित प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सोमवारपासून बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व अधिकारी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यातच सरकार नियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी महापालिकेत उपोषण सुरू केल्यामुळे त्यांच्या उपोषणाकडे अधिकारी गांभीर्याने पाहणार का? हे पहावे लागणार आहे.









