इमारत धोकादायक असल्याचा दावा, स्थलांतर होण्याची स्वच्छता कर्मचाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
आनंदवाडी येथील स्वच्छता कर्मचारी क्वार्टर्सच्या इमारती धोकादायक असल्याचे सांगुन रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. आझम नगर येथील बहुमजली इमारत तयार झाल्या असल्याने त्या ठिकाणी स्थलांतर होण्याची सूचना मनपाच्या आरोग्य अधिकाऱयांनी स्वच्छता कर्मचाऱयांना केली आहे. पण याबाबत कर्मचाऱयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
आनंदवाडी येथील पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती जीर्ण झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. इमारतीचे स्टिल गंजले असून बांधकाम साहित्य निकामी बनले असल्याने इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे इमारती रिकामी करून द्याव्यात, असा प्रस्ताव स्वच्छता कर्मचाऱयांसमोर ठेवण्यात आला आहे. आनंदवाडी येथील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱया कर्मचाऱयांना आझमनगर येथे उभारण्यात आलेल्या बहुमजली रहिवासी इमारतींमध्ये घरे देण्यात येतील. याठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करा किंवा आनंदवाडी येथील इमारतीचे बांधकाम होईपर्यंत आझमनगर येथे रहावे, अशी सूचना महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी मनपा स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या प्रमुख्य व्यक्तींना केली आहे.
शासनाकडून अद्याप ठोस निर्णय काही
येथील क्वॉर्टर्स कायमस्वरूपी देण्याची मागणी स्वच्छता कर्मचारी करीत आहेत. मात्र महापालिकेच्या कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगून रिकामी करण्याची सूचना यापूर्वी अनेकवेळा करण्यात आली होती. पण सरकारने स्वच्छता कर्मचाऱयांना घरे मंजूर केली आहेत. बेळगाव महापालिका का घरे देत नाही, असा मुद्दा उपस्थित करून स्वच्छता कर्मचारी संघटनेच्यावतीने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच स्वच्छता कर्मचारी वास्तव्य करीत असलेली घरे कायमस्वरूपी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. पण याबाबत शासनाकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास कायमस्वरूपी देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. पण आता मनपाने घरे रिकामी करण्यासाठी आटापिटा चालविला आहे.
आनंदवाडी खुल्या जागेत इमारत बांधून दिल्यास स्थलांतर होवू
आनंदवाडी येथे खुल्या असलेल्या जागेत इमारत बांधून देण्यात आल्यास त्या ठिकाणी स्थलांतर होवू. यापूर्वी याठिकाणी असलेली जीर्ण इमारत हटविण्यात आली होती. इमारत हटविण्यापूर्वी असंख्य आश्वासने महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली होती. पण याची पुर्तता झाली नाही. जर खुल्या जागेत इमारतीचे बांधकाम करून दिल्यास त्याठिकाणी स्थलांतर होण्यास काहीच हरकत नाही. पण आझमनगर येथे स्थलांतर होण्याबाबत स्वच्छता कर्मचारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेवू, असे कर्मचाऱयांनी आरोग्य अधिकाऱयांना सांगितले.









